बीड : राज्यातील बीड (Beed) जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणाचं केंद्र बनल्यामुळे राज्याचं लक्ष या जिल्ह्याकडे लागलं असून काही महिन्यांपूर्वी येथे चंदन तस्करीच्या टेम्पोवर, आणि बनावट दूध पावडरसाठीच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती. आता, बीड जिल्ह्यात चक्क हवालाच्या कामासाठीची मोठी रक्कम बीड पोलिसांनी (Police) जप्त केली आहे. त्यामुळे, बीडच्या व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. बीड पोलिसांनी तीन ठिकाणी छापा टाकून बीडमधून तब्बल 32 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

  


बीड शहरात सुरु असलेल्या हवाला रॅकेटवर बीड ग्रामीण आणि बीड शहरच्या पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केलीय. या कारवाईत बीड शहरात तीन ठिकाणी छापे मारत यात हवालाची 32 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्यासोबतच हवाला रॅकेटसाठी वापरले जाणारे मोबाईल, यासह इतर साहित्य देखील जप्त करण्यात आले आहेत. बीडमध्ये हवाला रॅकेट कार्यरत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी संयुक्तपणे ही कारवाई केली. बीड शहराच्या कबाडगल्ली, डीपी रोड तसेच आणखी एकाठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यात तिन्ही ठिकाणाहून लाखो रुपये जप्त करण्यात आले आहेत. हवाला रॅकेटचा उपयोग काळ्या पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी कली जातो. या कारवाईमुळे हवाला रॅकेट चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 


पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर


दरम्यान, बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं करताना दिसून येते. त्यातच, पुढील काही काळात विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. त्यामुळे, हवालाच्या पैशांचा म्हणजे काळ्या पैशांचा वापर अधिक प्रमाणात होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असून आज 32 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. 


हेही वाचा


Sharad pawar: मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट