Beed Crime : बीड जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतानाही काल झालेल्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या निवडीनंतर जल्लोश करणं नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. जमाव बंदी असतानाही गर्दी जमवली म्हणून राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांचे चिरंजीव नगरसेवक आदित्य पाटील यांच्यावर ही गुन्हा दाखल झाला आहे.
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन करत जमाव गोळा करणं केज शहरातील नगरपंचायतच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांना चांगलंच अंगलट आलं आहे. नगरपंचायतीच्या निवडी झाल्या आणि पदभार घेण्यापूर्वीच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसह 11 जणांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
भाजप पुरस्कृत स्थानिक आघाडी केजमध्ये सत्तेत आली. विशेष म्हणजे काँग्रेसच्या मदतीने याठिकाणी स्थानिक आघाडीचा नगराध्यक्ष बनला आहे आणि याच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला होता. अगदी फटाके फोडून पेढे वाटून आणि गुलाल उधळून या ठिकाणी मोठा जल्लोष करण्यात आला होता.
विशेष म्हणजे, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवकांनी ओपन जीपमधून मिरवणूक सुद्धा काढली होती. यावर प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकरणी ओपन जीपमधून जल्लोष करणारे रजनी पाटील यांचे चिरंजीव आणि केज नगरपंचायतचे नगरसेवक आदित्य पाटील यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाला आहे.
बीडच्या जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशाच्या अनुषंगाने पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी गर्दी न करण्याबाबत दिलेल्या आदेशाची मोडला आहे. केज शहरातील मंगळवार पेठ ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत गैरकायद्याचा जमाव करून 100 ते 150 लोकांना एकत्र आणले आणि विजयी मिरवणूक काढली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही आहेत 11 आरोपींची नावं
नवनिर्वाचित नगराध्यक्ष सिता प्रदीप बनसोड, उपनगराध्यक्ष शितल पशुपतीनाथ दांगट, जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हारून चाँदपाशा इनामदार, जेष्ठ नेते अंकुश इंगळे, नगरसेवक आदित्य अशोकराव पाटील, पशुपतीनाथ दांगट, नगरसेवक सोमनाथ गुंड, सुग्रीव माणिक कराड, नगरसेविका पल्लवी ओमप्रकाश रांजनकर, नगरसेविका पदमीन गुलाब शिंदे, शकील ईनामदार अशी आरोपींची नावे आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :