बीड: सीएनजी पंपाची (CNG Pump) परवानगी मिळून देतो म्हणून बीड मधील व्यावसायिकाचे 34 लाख रुपये लुटणाऱ्या दोन भावंडांना बीडच्या सायबर पोलिसांनी (Beed Cyber Police) राजस्थान येथून अटक केली आहे. बीडच्या सावता नगर भागामध्ये राहणारे रंगनाथ काळकुटे यांना बीड मधीलच राम शेळके या गुत्तेदाराने सीएनजी पंपाची परवानगी मिळवून देण्यासाठी मदत करतो असं सांगितलं आणि त्यानंतर संदीप शर्मा आणि राम शेळके या दोघांनी रंगनाथ काळकुटे यांच्याकडून 34 लाख रुपयांची रक्कम सीएनजी पंपाची परवानगी देण्यासाठी टप्प्याटप्प्याने घेतली होती.


काळकुटे यांनी पंपाची परवानगी मिळवण्यासाठी या दोघांनाही 34 लाख रुपये दिल्यानंतर दीड वर्ष उलटले तरी देखील पंपाची परवानगी मिळत नसल्याने रंगनाथ काळकुटे यांनी राम शेळके आणि संदीप शर्मा यांच्याकडे  पैसे परत देण्याची मागणी केली. वारंवार पैशाची मागणी करून देखील पैसे परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचं रंगनाथ काळकुटे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट सायबर पोलीस ठाणे गाठलं. फसवणूक करणारे राम शेळके संदीप शर्मा संदीप शेळके आणि हनीफ खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.


सायबर पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तांत्रिक तपासाला सुरुवात केली पैशाची देवाण-घेवाण कुठे झाली कशी झाली यामध्ये सर्व रेकॉर्ड्स तपासल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे राजस्थान पर्यंत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आणि बीड पोलीस राजस्थानमध्ये पोहोचले. राजस्थानमध्ये तीन दिवस गोपनीय तपास केल्यानंतर दोन आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आणि यामध्ये जाहीर आणि जुन्नर या दोन भावंडांना पोलिसांनी राजस्थान मधून अटक केली.


सायबरच्या उपनिरीक्षक निशिगंधा खुळे यांची जिगरबाज कारवाई


बीड पोलीस राजस्थानमध्ये पोहोचल्यानंतर हे दोन आरोपी जित्रेदी गावामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि यांना पकडण्यासाठी बीडच्या सायबर विभागातील पोलीस उपनिरीक्षक निशिगंधा खुळे या आपल्या टीम सह पोहोचल्या होत्या. मात्र या गावांमध्ये आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पश्चिम बंगालच्या सायबर पोलिसांची गाडी गावकऱ्यांनी पेटवून दिली होती तर अनेक वेळा पोलिसांवर दगडफेक देखील झाल्याच्या घटना या गावात घडल्या होत्या. मात्र निशिगंधा खुळे यांनी जिगरबाज कारवाई करत पहाटे या दोघांना अटक केली आणि गावातून काढता पाय घेतला आणि आरोपींना बीडला आणण्यात आलं.


या प्रकरणात तीन आरोपी अद्याप फरार असून पकडलेल्या दोन आरोपींची सध्या पोलीस कसून चौकशी करत आहेत. वेगवेगळे आम्ही दाखवून व्यावसायिक लोकांना फसवण्याचे काम ही टोळी करत असल्याचा अंदाज पोलिसांना आला असून सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक शैलेश जोगदंड हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या टोळीने आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आहे हे देखील या आरोपींची चौकशी केल्यानंतर समोर येणार आहे.