Beed: गुंतवणुकीवर पैसे कमवून देण्याचे अमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याची अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळचं गुंतवणूक करण्याअगोदर खातरजमा करणे गरजेचे आहे. दरम्यान, शेअर ट्रेडिंग आणि फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून आम्ही कोट्यावधी रुपये कमवतो. यातूनच तुम्हाला सुद्धा पैसे करून देऊ अशी बतावणी करून पुण्याच्या कंपनीसह एकाने बीडच्या अंबाजोगाई तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील आणि अशोक भोरे यांना 50 लाख रुपयांचा गंडा घातलाय.

अंबाजोगाई तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील आणि अशोक लिंबाजी भोरे यांच्या फिर्यादीनुसार पुण्याच्या संग्राम घाडगे याच्यामार्फत अशोक भोरे यांची ओळख अभिजीत आप्पासाहेब वाठारे याच्यासोबत झाली. मी शेअर ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये फेरफार करून मोठा फायदा कमावतो असे अभिजीतने सांगितल्याने अशोक भोरे यांनी त्याच्याकडे दोन लाख रुपये गुंतवले.

अल्पावधीतच अशोक यांना अडीच लाख रुपये परतावा देऊन अभिजीतने त्यांचा विश्वास संपादन केला आणि जास्त मोठी गुंतवणूक असल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे अशोक यांनी अभिजीतची ओळख दत्तात्रय पाटील यांच्यासोबत करून दिली. यावेळी अभिजीतने एआर ग्लोबल, एआर एन्टप्रायजेस व कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने तो फॉरेक्स व शेअर्स ट्रेडींग करतो, त्याचा बांधकाम व्यवसाय असून रोड कन्स्ट्रक्शनमध्ये नागपूरकडे 250-300 कोटींचे कामे सुरु असल्याचं सांगतिलं. त्याने आतापर्यत अनेकांना करोडपती केले असल्याचेही तो म्हणाला.

एवढेच नाही तर त्याने एआर ग्लोबल व एआर एन्टरप्रायझेस या कंपनीमध्ये गुंतवणूकीचा प्लँन सांगून जो नफा होईल, त्याचा 50 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. तसेच, पाहिजे त्यावेळेस एक महिन्यात ही रक्कम परताव्यासह मूळ रक्कम परत करण्याचे आणि तोपर्यंत परताव्याच्या रकमेसह धनादेश देण्याचेही कबूल केले.

अभिजीतच्या भूलथापांना बळी पडून दत्तात्रय पाटील आणि अशोक भोरे यांनी 15 ते 18 जुलै 2020 या कालावधीत 25 लाख रुपये बँकेतून आणि 25 लाख रोख असे एकूण 50 लाख रुपये त्या कंपनीत गुंतवले. त्यानंतर तीन-चार महिन्यांनी अभिजीतकडे रकमेची मागणी केली असता त्याने दोघांना पुण्यात बोलावून घेतले आणि भोरे यांच्या नावाने 98 लाखांचा धनादेश दिला. परंतु, धनादेश पात्रतेची तीन महिन्याची मुदत पूर्ण होण्याआधीच त्याने तो बँकेत जावू नये, रोख रक्कम देतो अशी विनंती केल्याने भोरे यांनी धनादेश बँकेत दिला नाही. परंतु, अनेक महिने उलटले तरी अभिजीतने पैसेही दिले नाही, कॉल घेणेही बंद केले आणि भेटही टाळली.

मात्र, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने दत्तात्रय पाटील आणि अशोक भोरे यांनी अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून रिलायबल ट्रेडर्स आणि अभिजीत आप्पासाहेब वाठारे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha