ठाणे : बदलापूर अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन राज्यभर तीव्र संताप आणि आंदोलने सुरू आहेत. या घटनेची दखल स्वत: मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन तातडीची सुनावणी देखील घेतली. हायकोर्टाने आपल्या सुनावणीत राज्य सरकार आणि पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलं होतं, लोकांनी रस्त्यावर उतरण्यापर्यंतची वाट तुम्ही पाहाता का, अशा शब्दात सरकारला फटकारलं. त्यामुळे, हे प्रकरण अतिशय संवेदनशील बनले असून पोलीस अधिकाऱ्यांपासून ते राज्य सरकारमधील मंत्रीही गांभीर्याने या प्रकरणात लक्ष घालत आहेत. त्यातच, काही समाजकंटकांकडून चुकीचे मेसेज पसरवरुन बदलापूरमधील वातावरण आणखी गढूळ किंवा तणावाचे केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर बदलापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पीडित मुलीचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी व चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवल्याप्रकरणी एका 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा उद्रेक म्हणून बदलापूरमध्ये संबंधित शाळेवर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर, हे आंदोलक रेल्वे स्टेशनवर (Railway Station) पोहोचले, तेथे 7 ते 8 तास आंदोलकांनी बदलापूरहून जाणाऱ्या ट्रेन बंद ठेवल्याने आंदोलनास हिंसक वळण मिळालं होतं. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लाठीचार्ज करुन हे आंदोलन मोडीत काढले. त्यानंतर, बदलापूरमध्ये संपूर्ण एक दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, इंटरनेटसेवा सुरळीत झाल्यानंतर काही जणांकडून चुकीचे मेसेज समाजमाध्यमांवर पसरवण्यात आले होते. त्यावरुन, आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
बदलापूर (Badlapur) येथील अल्पवयीन पीडितेच्या व तिच्या कुटुंबीयांच्या प्रकृतीविषयी चुकीची व गैरसमज पसरवणारे मेसेजेस सोशल मीडियावर पसरवून समाजामध्ये असंतोष पसरवणाऱ्या तरुणीला सायबर सेल पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन ऋतिका प्रकाश शेलार वय (21 वर्षे) रा.चामकोली अंबरनाथ हिला ताब्यात घेऊन तिच्यावर अफवा पसरून समाजात अशांतता पसरवण्याच्या संदर्भाने गुन्हा पोलीस स्टेशन बदलापूर पूर्व येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
या तरुणीने शेयर केलेली पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. त्यानंतर, समाजमाध्यमातून गैरसमज पसरून समाजात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, अशा प्रकारचे गैरसमज व चुकीचे मेसेज पसरवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी जनतेला आवाहन केले की, कोणीही कोणत्याही स्वरुपात अफवा पसरवू नयेत आणि कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही बदलापूर पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, पीडित तरुणीबाबत खोट्या व चुकीच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. या अफवांमध्ये कुठलेही तथ्य नसून नागरिकांनीही संवेदनशील विषयात जबाबदारीने वागायला हवं.
हेही वाचा
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार