कोल्हापूर समरजित घाटगे (Samarjit Ghatge)  आणि भाजपच्या (BJP)  ब्रेक-अपवर आता जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. याचं कारण म्हणजे घाटगे यांनी आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंट्सवरून भाजपचं कमळ चिन्ह हटवलं आहे. घाटगे यांना कागल मतदारसंघातून भाजपचं तिकीट हवं होतं. मात्र अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर झाली आणि घाटगे अस्वस्थ झाले. फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटलांशी त्यांनी चर्चा केली. खासदार धनंजय महाडिक यांनी देखील त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र घाटगे आपल्या भूमिकेवर ठाम होते. अखेर त्यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या पक्षात जाण्याचं नक्की केल्याचं दिसतंय. 


आगामी विधानसभा  निवडणुकीच्या तोंडावर समरजीत घाटगे  हातातलं कमळ सोडून शरद पवारांच्या  राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. समरजीत घाटगे हे शरद पवारांच्या संपर्कात  असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय  सूत्रांनी दिलीय.हसन मुश्रीफ यांची उमेदवारी घोषित करून महायुतीचा आणि आपला संबंधच संपल्याचा संदेशच दिलाय असं समरजित घाटगेंनी म्हटल्याची माहिती आहे. भाजप शिष्टमंडळासमोर त्यांनी ही बाजू मांडली. त्यामुळे आज होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही असंही ते म्हणाले. आता आपण खूप पुढे निघून गेलोय, मागे येणं शक्य नाही असंही ते म्हणाले. काल समरजित घाटगेंच्या भेटीसाठी आलेल्या भाजप शिष्टमंडळासमोर त्यांनी या भावना मांडल्याचं समजतंय. 



 कोण आहे समरजीत घाटगे?



  • समरजीत घाटगे पेशाने सीए

  • समरजीत घाटगे यांचा 2019  पूर्वी भाजपमध्ये प्रवेश

  • भाजप जिल्हाध्यक्ष, पुणे म्हाडाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं

  • 2019 साली भाजप-सेना युतीत तिकीट नाही, मुश्रीफांविरोधात अपक्ष लढले

  • पहिल्यांदाच लढून 90 हजारांहून अधिक मतं घेत लक्ष वेधलं

  • आता घाटगे यांनी 'बदल हवा तर आमदार नवा' म्हणत मुश्रीफांविरोधात शड्डू ठोकलाय


समरजित घाटगे विधानसभा लढण्यावर ठाम


समरजीत घाटगे यांनी येत्या 23ऑगस्टला कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे.  त्यात ते त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. त्याआधीच भाजपने त्यांना विधानपरिषदेची ऑफर दिल्याचंही समजतंय. शरद पवार यांनी समरजीत घाटगेंसाठी फिल्डिंग लावल्याचं लक्षात आल्यावर भाजपने त्यांची समजूत घालण्यासाठी धावाधाव सुरू केलीय. समरजीत घाटगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि चंद्रकांत पाटलांची भेट घेतली.पण विधानसभा लढण्यावर ते ठाम असल्याचं समजतंय.


हे ही वाचा :


मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य