Uttar Pradesh Azamgarh Crime : श्रद्धा वालकर हत्याकाडांनंतर (Shraddha Murder Case) अवघा देश हादरला. या प्रकरणात होणारे नवनवे खुलासे थरकाप उडवून देत आहेत. अशातच याच प्रकरणाशी मिळतंजुळतं प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) आझमगढमध्ये (Azamgarh Crime News) काही दिवसांपूर्वी विहिरीत एक मृतदेह आढळून आला होता. पण हा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता. या मृतदेहाचे 5 ते 6 तुकडे करण्यात आले होते. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.


आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस तपासासाठी त्याच्यासह घटनास्थळी गेले. त्यावेळी त्याठिकाणी लपवून ठेवलेल्या गावठी बंदुकीतून आरोपीनं पोलिसांवर गोळीबार केला. त्यामध्येच आरोपी जखमी झाला. दरम्यान, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीला अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर या निर्घृण हत्येचा उलगडा झाला. आरोपीनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मृतदेहाचं शीर ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, आरोपीनं आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचा कबुली जबाब दिला आहे. 


15 नोव्हेंबर रोजी विहिरीत सापडला मृतदेह 


15 नोव्हेंबरला आझमगढ जिल्ह्यातील अहरौला पोलीस स्टेशन हद्दीतील गौरी का पुरा गावात रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे अनेक तुकडे करण्यात आले होते. दिल्लीत घडलेल्या श्रद्धा हत्याकांडासारखीच घटना जिल्ह्यात उघडकीस येताच संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. पोलिसांना ही घटना कळताच त्यांनी तात्काळ तपासाची सूत्र हलवली. या प्रकरणाचा छडा लावणं पोलिसांसाठी आव्हान होतं. पोलिसांनी तरुणीची ओळख पटवून तिच्या नातेवाईकांची आणि मित्रांची चौकशी सुरू केली, त्यानंतर हत्येचे रहस्य 
उलगडलं आणि आरोपीचा तपास सुरु झाला. 


आधी एकत्र फिरले त्यानंतर हत्या


पोलिसांना तपासात मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचा एक मित्र होता. त्याच्या भावाशीही तरुणीची ओळख होती. मित्राचा भाऊ प्रिंसला तरुणी कधीकधी भेटायची. हत्येच्या दिवशी तरुणी भैरवधामला जाण्यासाठी घरातून निघाली होती. तिला भैरवधामला आरोपी प्रिंसनं बाईकवरुन सोडलं होतं. घटना घडली त्या दिवशी संपूर्ण दिवस तरुणी आणि आरोपी एकत्रच होते. दोघांनी हॉटेलमध्ये जेवणंही केलं होतं. त्यानंतर संध्याकाळी तरुणीला घरी घेऊन परतत असताना आरोपीनं तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते पॉलिथीनच्या बॅगेत भरून वेगवेगळ्या जागांवर फेकून दिले.  


दोन वर्षांपासून सुरु होते प्रेमसंबंध


पोलीस चौकशीत आरोपी प्रिंसनं सांगितलं की, मृत तरुणीसोबत त्याचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबध सुरु होते. प्रिंस विदेशात काम करत होता. याचवर्षी फेब्रुवारीमध्ये मृत तरुणीचा विवाह दुसऱ्या व्यक्तीशी झाला होता. ज्यावेळी त्याला यासंदर्भात माहिती मिळाली, तेव्हा तो परदेशातून परतला. त्यानंतर तरुणीला माझ्याशी लग्न कर, असं म्हणत धमकावू लागला. एवढंच नाहीतर प्रिंसनं मृत तरुणीच्या आई-वडिलांशीही बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी विरोध केल्यानंतर त्यानं 29 ऑक्टोबर रोजी तरुणीच्या हत्येचा कट रचला. 


शास्त्रीय पद्धतीनं खुनाचा उलगडला 


पोलीस चौकशीत शेतात नेऊन तरुणीचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली प्रिन्सनं दिली. त्यानंतर चाकूच्या मदतीनं त्यानं तिच्या शरीराचे तुकडे केले आणि ते तुकडे पॉलिथिन बॅगेत भरून विहिरीत फेकून दिले. पोलिसांना मृत तरुणीचं शीर सापडलं असून त्यांनी ते ताब्यात घेतलं आहे. तसेच, हत्येसाठी वापरलेल्या दोन बॅगा आणि कपडेही जप्त करण्यात आले आहेत. या घटनेचा शास्त्रोक्त पद्धतीने खुलासा केल्याचे पोलीस अधीक्षक अनुराग आर्य यांनी सांगितलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mangaluru Blast Case : रिक्षामधून कुकर बॉम्ब घेऊन जात होता आरोपी, अचानक झाला स्फोट; दहशतवादी कट असल्याची पोलिसांची माहिती