Aurangabad Crime News : औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागातील शताब्दीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉनच्या परिसरातील लाईट चोरल्याच्या कारणावरून एका तरुणाची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. चोरीची कबुली दे म्हणत ही मारहाण करण्यात आली असून, मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. मनोज शेषराव आव्हाड असं मृत तरुणाचं नाव असून, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील शताब्दी नगर भागातील एका माजी नगरसेवकाच्या लॉनमध्ये मनोज हा देखरेख करण्याचं काम करायचा. दरम्यान लॉनमधील दहा-पंधरा हजार किमतीची लाईट चोरीला गेल्याची घटना घडली होती. तर ही चोरी मनोज आव्हाड यानेच केली असल्याचा संशय घेऊन लॉन मालकाच्या मुलासह इतर चार-पाच लोकांनी बुधवारी रात्री लाठ्या-काठ्याने त्याला बेदम मारहाण केली होती. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडीओ सुद्धा मोबाईलमध्ये चित्रित केला होता. 


मनोजला झालेल्या बेदम मारहाणीनंतर त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तर घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून, पंचनामा करण्यात येत आहे. तर याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 


मारहाणीचा व्हिडीओ समोर 


मनोज आव्हाड याला मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. ज्यात चार-पाच जण मारहाण करताना पाहायला मिळत आहे. तर दोन जणांच्या हातात दांडके असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. मनोजचे पाय बांधून त्याला दांड्याने बेदम मारहाण होत असल्याचे या व्हिडीओतून स्पष्ट दिसत असून, याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे.



इतर महत्वाच्या बातम्या


Daund Crime : भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केल्याचा राग, 23 जणांच्या टोळक्याचा पोलिसासह मित्रांवर जीवघेणा हल्ला



Crime News : दिल्लीत भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, भररस्त्यात 6 गोळ्या झाडल्या, सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू