Aurangabad Crime News : औरंगाबाद (Aurangabad) शहर पोलिसांच्या हद्दीतील गुन्हेगारी घटना काही थांबता थांबायला तयार नाहीत. लुटमार, चोऱ्या आणि अवैध धंदे वाढले आहेत. अशात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या वाळूज भागातील रांजणगाव शेणपुजी येथे गोळाबारीची घटना समोर आली आहे. बहिणीला पळवून नेल्याचा जाब विचारल्याने गावठी कट्ट्यातून ही गोळीबार करण्यात आला असून, यात एकजण थोडक्यात बचावला आहे. मात्र गोळी पायावर लागल्याने एकजण जखमी झाला आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर श्रावण सुरेश पिंपळे (रा. नायतळा ता. निफाड जि. नाशिक) असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. 


वाळूजच्या रांजणगाव शेणपुजी परिसरात राहणाऱ्या फिर्यादीच्या चुलत बहिणीला श्रावण पिंपळे हा दोघांच्या मदतीने पळवून घेऊन गेला होता. दरम्यान, यावरून 25 जुलै रोजी पिंपळे याने फिर्यादीच्या भावाला फोनवर संपर्क केला असता शिवीगाळ केली. दरम्यान, यावेळी श्रावणला समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता तो अचानक फिर्यादीच्या घरी आला. तसेच फिर्यादीच्या भावाला मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. मात्र जीव वाचवण्यासाठी त्यांनी तिथे असलेला शटर बंद केला. मात्र बंद शटरमधून गोळी आरपार जाऊन फिर्यादीच्या गुडघ्याला लागली आणि तो जखमी झाला. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर यावरून वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


परिसरात खळबळ...


वाळूजच्या रांजणगाव शेणपुजी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तर स्थानिक नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. वळुज भागात गुंडाची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी  होत आहे. 


वाळूज भागात गुन्हेगारी वाढली...


औरंगाबादच्या वाळूज भागांत मोठी एमआयडीसी असल्याने या ठिकाणी गेल्या काही वर्षात राहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्यातील वेगेवेगळ्या जिल्ह्यातून आणि इतर राज्यातून कामानिमित्त येणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. दरम्यान, असे असतांना या भागात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहेत. या भागात गुंडगिरी करणाऱ्या तरुणांच्या अनेक टोळ्या सक्रीय आहेत. छोटे-मोठे वाद झाल्यावर थेट तलवारी, लाठ्या, काठ्या बाहेर निघतात. तसेच अवैध धंदे देखील मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी याच भागात जमिनीच्या वादातून तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यात आता थेट गोळीबाराची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


धक्कादायक! भ्रष्टाचाराची तक्रार केली म्हणून ‘समाजसेवका'ची काढली धिंड; चपलेने मारहाणही केली