RTE School Admission Scam Nagpurखोटी कागदपत्रं दाखवून आरईटी अंतर्गत मुलांचे खासगी शाळेत प्रवेश केल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी आणखी एका पालकाला अटक केली आहे. मंगळवारी एका पालकाला अटक केल्यानंतर पोलिसांनी आज आणखी एका पालकाला अटक केली आहे. दरम्यान याप्रकरणी शाहिद शरीफ नावाचा व्यक्ती मास्टर माईंड असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. तर तो एक आरटीआय कार्यकर्ता असल्याची माहितीही पोलिसांनी (Nagpur Police) केलेल्या तपासातून पुढे आली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी आनंद टॉकीज जवळील शाहिद शरीफच्या कार्यालयावर छापे टाकत आरटीईशी संबंधित तीन पोते कागदपत्रे, दस्तावेज आणि इतर  साहित्य जप्त केले आहे. त्यामुळे नागपुरात आरटीईच्या रॅकेटचे (RTE Education)  लोण आणखी कुठवर पसरलं आहे, याचा तपास सध्या पोलीस करत असून आणखी काही माहिती हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  


आतापर्यंत 20 पालकांच्या विरोधात गुन्हे दाखल


आरटीई घोटाळा प्रकरणी आतापर्यंत नागपुर पोलिसांनी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात 17 पालकांविरोधात तर सदर पोलीस ठाण्यात 2 पालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता आणखी एका गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार पालकांना खोट्या कागदपत्रांच्या आधारे विविध शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी शाहिद शरीफच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे बनवण्यात आली होती. त्यासाठी बोगस उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, रहिवासी प्रमाणपत्र बनवून नामांकित शाळांमध्ये मुलांचे प्रवेश घेण्यात आले.


दरम्यान, ज्या एजंटच्या माध्यमातून हे प्रवेश घेण्यात आले होते, त्या एजंटचा आणि ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे जातीचे दाखले व इतर दस्तावेज बनवून दिले होते, त्यांचे आपापसात काही संगनमत आहे का, याचा तपास केला जात आहे. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आमिष दाखवून हे खोटे दस्तावेज बनवून घेण्यात आलेत का याचाही तपास पोलीस करत आहेत. तसं आढळल्यास प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आरोपी बनवले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली. दरम्यान नागपूर येथील विविध शाळा व्यवस्थापनांनी आपापल्या शाळेत आरटीई अंतर्गत झालेल्या प्रवेशांची पुन्हा तपासणी करावी, अशी अपेक्षाही पोलिसांनी व्यक्त केली आहे. 


बोगस कागदपत्रांच्या आधारे आरटीई प्रवेश


6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी सरकारने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची सोय केली आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत निवडक जागा गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. मात्र, याच जागांवरील प्रवेशात मोठा घोळ केला जात असल्याचे नागपुरात समोर आले आहे. नागपुरात आरटीई अंतर्गत विविध शाळांमध्ये प्रवेश घेताना पालक बोगस कागदपत्रांच्या आधारे आपल्या पाल्यांचे प्रवेश करून घेत असल्याची तक्रार शिक्षण विभागाला मिळाली होती. त्यानंतर आधी शिक्षण विभाग आणि संबंधित शाळांनी प्राथमिक चौकशी केल्यावर त्यात तथ्य आढळले. त्यानंतर शिक्षण विभागाने नागपूर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत नामांकित शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्रासह इतर डॉक्युमेंट्स बोगस पद्धतीने तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


भटक्या कुत्र्यानं लचके तोडल्यानं तीन वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अंत; नागपुरातील धक्कादायक घटना