मुंबई : अंधेरी (Andheri) एमआयडीसी (MIDC) परिसरामधून हरवलेली चारही मुलांना शोधण्यात मुंबई गुन्हे शाखा पोलिसांना (Mumbai Police) मोठं यश मिळालं आहे. अखेर सहा दिवसानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 10 ने चारही मुलांचा शोध घेतला आहे. मुंबईच्या अंधेरीतील हरवलेली चारही मुलं (Mumbai Crime News) मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये सापडली आहेत. कौटुंबिक कारणामुळे हे मुलं मुंबईतून दिल्लीसाठी निघाली होती, मात्र खांडवा रेल्वे स्टेशनमधून ही मुलं हरवली होती. 


अंधेरीतील त्या चार बेपत्ता मुलांचा शोध लागला


हरवलेली चारही मूलं आता पोलिसांना सापडली आहे. हरवलेल्या चार मुलांमध्ये तीन बहिण आणि एक भाऊ यांचा समावेश होता. आता ही मुलं सुखरुप असल्याची माहिती आहे. मुलांच्या मामाच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी मुले बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करून मुलांना शोधण्याला सुरुवात केली होती. गेल्या सहा दिवसांपासून ही मुले बेपत्ता होती. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना या बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात यश मिळालं आहे. 


मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये सापडली मुलं


पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करुन रेल्वे स्टेशनवर असलेले सीसीटीव्हीचा शोध घेतला. पोलिस सीसीटीव्ही चेक करत-करत थेट ग्वालियरपर्यंत पोहोचले आणि ग्वालियरमधून या सर्व मुलांना पोलिसांनी शोधलं आहे. सध्या मुंबई पोलिस ग्वालियरमधून चारही मुलांना घेऊन मुंबईसाठी निघाले आहेत, या मुलांनी हे पाऊल का उचललं, यामागचं खरं कारण काय आहे, हे सर्व तपास आता मुंबई पोलीस करणार आहेत.


सावत्र आईकडून मारहाण


मुंबईच्या अंधेरी पूर्वे एमआयडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून चार लहान मुलं हरावल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये सावत्र आईचा हात असल्याची शंका मामाला आहे. तीन मुली आणि एका मुलाचा यामध्ये समावेश आहे. सावत्र आईने तीन मुली आणि मुलाला विकल्याची शंका मामाने व्यक्त केली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली.


वडील आणि सावत्र आई यांच्याकडून 25 मे 2024 रोजी चारही मुलांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर 26 तारखेला चारही मुले घरातून दिल्लीसाठी निघाले होते.  मात्र खंडवा स्टेशन वरून चारही मुले गायब झाल्याचा आरोप मुलांच्या मामांनी केला आहे. मुलांच्या मामाच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. एमआयडीसी पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेचे पथक चारही मुलांचा शोध घेत आहे.