Alibaug  News Update : अलिबागमध्ये एका टुरिस्ट कॉटेजमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत. कुणाल गायकवाड (वय, 29), प्रियांका इंगळे (वय, 25) आणि त्यांच्या दोन मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. हे सर्व जण पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील राहणारे होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. गायकवाड कुटुंबीय पर्यटनासाठी आलिबागला आले होते आणि गेल्या सहा दिवसांपासून ते याच कॉटेजमध्ये राहत होते, अशी माहिती मिळाली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड कुंटुंब मागच्या बुधवारी म्हणजे 11 मे रोजी आलिबाग येथील टूरिस्ट कॉटेजमध्ये मुक्कासाठी आले होते. बुधवारपासून हे सर्व जण याच कॉटेजमध्ये राहात होते. परंतु, आज सकाळपासून त्यांच्यापैकी कोणीच रूम मधून बाहेर आले नव्हते. त्यामुळे कॉटेज मालकाने आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गायकवाड कुंटुंब राहात असलेल्या रूमचा दरवाजा उघडून पाहिले. यावेळी बेडवर दोन्ही मुलांचे मृतदेह होते तर कुणाल आणि प्रियांका यांचे गळफास घेतलेल्या आवस्थेत मृतदेह आढळून आले. 


कॉटेज मालकांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसींनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. परंतु, चौघांच्याही मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. कुणाल आणि प्रियांका यांनी दोन्ही मुलांना विष पाजून त्यांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.  


दरम्यान, पोलिसांनी मृत कुणाल गायकवाड याच्या कुटंबीयांशी संपर्क साधल्यानंतर कुणाल आणि प्रियांका हे दोघे जण हरवले असल्याची तक्रार 2 मे रोजी शिक्रापूर पोसील ठाण्यात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. कुणाल याच्या कुटुंबीयांनी ही तक्रार दिल्याची माहिती मिळत आहेत. 


अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या तपासानंतरच गाडकवाड कुटुंबीयांच्या मृत्यूसंदर्भात माहिती पुढे येवू शकते. पर्यटनासाठी आलेल्या या कुटुंबाने असे टोकाचे पाऊल का उलले याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत.