TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


पंतप्रधान मोदींच्या 'कान्स चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा


'कान्स चित्रपट महोत्सव' हा सर्वात मोठा चित्रपट महोत्सव मानला जातो. आजपासून या 'कान्स चित्रपट महोत्सवा'ला सुरुवात झाली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवासंदर्भात ट्वीट करत महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत.


'निकम्मा'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  शिल्पा शेट्टीच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात असतात. काही दिवसांपूर्वी शिल्पाचा 'हंगामा 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता लवकरच तिचा  'निकम्मा' हा चित्रपट रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये अभिनेता अभिमन्यु दसानी  हा जबदस्त लूकमध्ये दिसत आहे. ट्रेलरमध्ये  रोमान्स, कॉमेडी, इमोशन आणि अॅक्शन असा कम्पलीट पॅकेज असणारा हा सिनेमा 17 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


‘ठेच’ चित्रपटाचा टीझर लाँच


‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ अशी एक म्हण मराठीत आहे. आयुष्याचा प्रवास ठेचा खाऊनच होतो. काहीवेळा प्रेमातही ठेच खावी लागते. कॉलेजजीवनातील प्रेमात खाल्लेली 'ठेच' आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार असून, 15 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ठेच या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सय्यद मोईन सय्यद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे.


'रानबाजार'च्या टीझरला एका दिवसांत मिळाले 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज


वेबविश्वाला हादरवून टाकणारी 'रानबाजार' ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या टीझरला एका दिवसांत 10 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 


कन्नड अभिनेत्री चेतना राजचे निधन


 कन्नड मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री चेतना राजचे निधन झाले आहे. तिनं वयाच्या 21 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, बंगळुरुमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये प्लॅस्टिक सर्जरी  केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिला काल (16 मे) सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिच्यावर 'फॅट फ्री' शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिला शरीरामध्ये काही बदल जाणवले.  फुफ्फुसात पाणी शिरल्यानं संध्याकाळी तिची तब्येत खालावली. तिला श्वास घेण्यात देखील त्रास जाणवू लागला.


केतकी चितळेवर अंबाजोगाईतही गुन्हा दाखल


राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल समाज माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकारणी अडचणीत आलेल्या केतकी चितळे हिच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात देखील गुन्हा नोंद करण्यात आला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. दरम्यान राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी देखील केतकी चितळेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.


माफी मागितल्यानंतरही भारती सिंह विरोधात एफआयआर दाखल!


प्रसिद्ध  कॉमेडियन भारती सिंहच्या विनोदी शैलीला प्रेक्षकांची पसंती मिळते. वेगवेगळ्या कॉमेडी शोमधून भारती प्रेक्षकांच्या भेटीस येते. सोशल मीडियावर देखील भारती वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. नुकताच एक व्हिडीओ भारतीनं सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमामधून भारतीनं प्रेक्षकांची माफी मागितली. पण आता भारतीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


‘डॉक्टर स्ट्रेंज’ फेम झारा फायथियनला 8 वर्षांचा तुरुंगवास


डॉक्टर स्ट्रेंज अभिनेत्री झारा फायथियन हिने आणि तिच्या तायक्वांदो मास्टर-पतीने 13 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्यामुळे तिला आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहवालानुसार, झारा आणि तिचा पती व्हिक्टर मार्के हे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या 14 गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले आहेत. या व्यतिरिक्त, एका 15 वर्षांच्या मुलीवर देखील अत्याचार केल्याप्रकरणी आणखी चार गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला आहे. 2002 ते 2003 या कालावधीत हे प्रकरण घडले होते.


शैलेश लोढा 'तारक मेहता' मालिकेचा घेणार निरोप? शूटिंग करणं केलं बंद


छोट्या पडद्यावरी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेली 14 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमधील दिशा वकानी, नेहा मेहता, गुरुचरण सिंह या  कलाकारांनी काही दिवसांपूर्वी मालिकेचा निरोप घेतला. आता अशी चर्चा सुरू आहे की, शैलेश लोढा हे देखील या मालिकेचा लवकरच निरोप घेणार आहेत. मालिकेमध्ये शैलेश तारक मेहता ही भूमिका साकारत होते.  


रॉकिंग स्टार यशचा 'केजीएफ-2' करतोय रेकॉर्ड ब्रेक कमाई


'रॉकिंग स्टार' अशी ओळख असणाऱ्या अभिनेता यशच्या   केजीएफ-2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.  चित्रपट रिलीज होऊन पाच आठवडे झाले. तरी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता जगभरामध्ये या चित्रपटानं 1200 कोटींची कमाई करुन अनेक चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचं रेकॉर्ड  तोडलं आहे.