Akola News : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या (Suicide) केली. अकोला (Akola) जिल्ह्याच्या उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरी इथे ही घटना घडली आहे. जयश्री नागे (वय 26 वर्षे, राहणार पैलपाडा, जि. अकोला) असं या विवाहितेचं नाव आहे. तिचं सासर अकोला जिल्ह्यातील पैलपाडा गावातलं आहे. पंचायत समिती निवडणुकीसाठी 5 लाख रुपये माहेरकडून आणण्यासाठी सासरच्यांनी तिच्यामागे तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळून अखेरीस जयश्रीने स्वत:चे आयुष्य संपवलं. सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळूनच जयश्रीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. आता या प्रकरणात सासरच्यांवर स्थानिक पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असून तिच्या पतीला अटक केली आहे. गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या लोकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते असलेले तिचे सासरे आणि अकोला पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव नागे, सासू आणि वंचितच्या विद्यमान पंचायत समिती सदस्य शोभा नागे यांचा समावेश आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
जयश्रीची आई नंदा रामदास साबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 एप्रिल 2021 रोजी जयश्री हिचा विवाह पैलपाडा येथील आशिष वसंतराव नागे यांच्यासोबत झाला. आशिष खाजगी शेतीचा व्यवसाय करतो. तर सासरचे कुटुंबीय अकोला तालुक्यातील राजकीय क्षेत्रातले मातब्बर आहेत. सासरे वसंतराव मारोती नागे हे वंचित बहुजन आघाडीकडून अकोला पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत. तर सासू शोभा नागे या सध्या पंचायत समिती सदस्या आहेत. पती आशिष, सासरे वसंतराव नागे, मोठे दिर नितीन वसंतराव नागे, सासू शोभा नागे, नणंद जयश्री सुभाष खराटे आणि वेदांती अनिल पातोंड यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. लग्नानंतर सुरुवातीला सासरच्यांनी जयश्री नागे यांना चांगले वागवले. काही दिवस गेल्यानंतर पती आशिषसह सासरच्या मंडळींनी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जयश्री हिला निवडणुकीसाठी माहेरातून 5 लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. माहेरकडील आर्थिक परिस्थिती ठीक नसताना सुद्धा जयश्रीने 2 लाख 50 हजार रुपये सासरी आणून दिले. मात्र, त्यानंतर तिचा छळ कमी होईल आणि पुन्हा सर्व सुरळीत होईल, असे वाटलं होतं. परंतु, पुन्हा उर्वरित 2 लाख 50 हजार रुपयांसाठी तिचा प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सुरु होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती माहेरीच राहात होती. पती आशिष हा ती माहेरी असताना सुद्धा पैसे आणण्यासाठी तिला धमक्या देत होता. अखेर माहेरी असतानाच जयश्रीने गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या लोकांच्या छळापायीच आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार आई नंदा साबळे यांनी उरळ पोलिसात केली आहे. या तक्रारीनुसार सासरच्यांवर 498 (ए), 304 (बी), 306, 504, 506, 34 या कलमांन्वये गुन्हे दाखल झाले आहेत, यासंदर्भात पती आशिष याला पोलिसांनी अटक केली आहे.
जयश्रीजवळच्या पेन ड्राईव्हमुळे छळाला फुटली वाचा
जयश्रीने पैलपाडा येथील सासरच्यांनी कशाप्रकारे शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे. या संपूर्ण गंभीर प्रकरणाचा डाटा पेन ड्राईव्हमध्ये गोळा केला आहे. आपल्या आत्महत्येस सदर आरोपीच जबाबदार असल्याचे जयश्रीने एका व्हिडीओत स्पष्ट म्हटले आहे.
मुलगी झाली म्हणून अतोनात छळ
जयश्रीला 10 मे रोजी मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून तिच्या नागे कुटुंबियांनी अतोनात छळ केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. तर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जाणीवपूर्वक त्रास देऊन जयश्री यांना पती आशिष नागे याने मारहाण सुद्धा केल्याचं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणामुळे अकोला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणानंतर आता वंचित माजी सभापती वसंतराव नागेंसह त्यांची पंचायत समिती सदस्य असलेली पत्नी शोभा नागेंवर काय कारवाई करते? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.