Akola Crime News अकोला : शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. शहरात काल मध्यरात्री दोन खुनाच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे दोन्ही खून रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या (Ramdaspeth Police Station) हद्दीत झालेत. दोन्ही खुनाच्या घटनामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. अतुल रामदास थोरात (40) आणि राज संजय गायकवाड (18) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
अतुल थोरात (Atul Thorat) याची धारदार शस्त्रांनी रेल्वे स्टेशन चौकातच हत्या करण्यात आली. तीन अज्ञात मारेकर्यांनी अतुलवर धारदार शस्त्राने वार करून त्याला जागीच संपवलं. तर शहरातीलच देशमुख फैल भागातील राज गायकवाडवर (Raj Gaikwad) तीन अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करत हल्ला चढवला आणि यामध्ये राजचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात रामदास पेठ पोलीस ठाण्यात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे अकोला शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
धारदार शस्त्रांचा वापर करीत संपवलं
अतुल थोरात रेल्वे स्टेशनजवळील गुजराथी उपहार गृहासमोरुन दुचाकीवरून येत असताना तीन अज्ञातांनी त्याला थांबवून घेरले. त्यांच्यात वाद झाला, वादादरम्यान हाणामारी सुरू झाली. अतुलने प्रतिकार केला, परंतु थोड्याच काळात आरोपींनी धारदार शस्त्रांचा वापर करीत त्याच्यावर वार केले. जखमी अतुलची आजूबाजूच्या नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु मारेकऱ्यांनी नागरिकांना धमकावले. अतुलची हत्या करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान रामदास पेठ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. अद्यापपर्यंत अतुल थोरात यांच्या हत्येचं मूळ कारण समजलं नसून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
पहिल्या घटनेचा पंचनामा होत नाही तोच दुसरी हत्या
विशेष म्हणजे अतुलच्या हत्येच्या घटनास्थळीचा पंचनामा सुरू असतानाच याच पोलीस स्टेशन हद्दीतील भवानी पेठेत हत्येची दुसरी घटना घडली. देशमुख फाईलजवळच्या भागात राहणाऱ्या राज संजय गायकवाड (18) याचीही तीन अज्ञात आरोपींनी हत्या केल्याचं समजते. काल अकोल्यात श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रेचा आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेत हजारो संख्येने नागरिक उपस्थित होते.
सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरु
या दरम्यान राजूचा काही युवकांशी वाद झाला होता. हा वाद मित्रांच्या मदतीने इथंचं शांत झाला. परंतु रात्री 2 वाजताच्या सुमारास राजूच्याच घरी काही तरुण आले. त्यांनी लगेचच धारदार शस्त्रांनी राजूच्या अंगवार वार केले. राजूचे नातेवाईक आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तोपर्यंत त्याचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान या दोन्ही हत्येच्या घटनांमध्ये तीनच आरोपी होते, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. अतुल थोरात यांच्या हत्येच्या ठिकाणचे पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडिओ जप्त केले असून त्या आधारावर आरोपींचा शोध घेतला जात आहे.