Ahmednagar Crime: आधी तरुणींशी फेसबुक (Facebook), इन्स्टाग्रामवरुन (Instagram) मैत्री आणि नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक... असे प्रकार आपण अनेकदा पाहिले असतील. परंतु अहमदनगरच्या कोपरगाव शहरात घडलेला प्रकार हा काहीसा हादरवणारा आहे. माणसाची वृत्ती आणि डोकं अशाही प्रकारे चालतं याचा अंदाजही कुणाला बांधता येणार नाही. कोपरगाव शहरातील 20 वर्षीय तरूणीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख करून एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचे फोटो आणि व्हिडीओ तयार करत ब्लॅकमेल केलं आणि त्यातून तिला धर्मपरिवर्तन करण्यास प्रवृत्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


नेमकं काय घडलं मुलीसोबत?


मूळचा मध्य प्रदेशातील इंदोर येथे राहणारा सायम कुरेशी याने तीन वर्षापूर्वी कोपरगाव येथील 20 वर्षीय तरूणीशी इन्स्टाग्रामवरून ओळख निर्माण केली. त्या दोघांनी एकमेकांना फोन नंबर शेअर केले. या तरुणाने पुढे तरुणीला प्रथम आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 21 मे 2023 रोजी तरुणाने कोपरगाव गाठलं आणि मुलीला खडकी येथील मदरशात बोलावलं. मुलीच्या मर्जीविरोधात त्या मदरशातच तरुणाने तिच्यावर अत्याचार केले आणि सहकाऱ्यांच्या मदतीने तिचे फोटो आणि व्हिडीओ काढले.


काढलेल्या फोटो आणि व्हिडीओचा वापर करुन सायम हा तरुण मुलीला ब्लॅकमेल करू लागला. झाकील नाईकचे अनेक व्हिडीओ पाठवून तिच्यासोबत निकाह करण्यासाठी तो जबरदस्ती करू लागला. पुढे या तरुणाने मुलीला ब्लॅकमेल करत थेट इंदोरला बोलावले, तिथे बळजबरीने धर्मांतर करून तिला नमाज पठण करण्यास लावले.


मुलीला ब्लॅकमेल करत मौलवीकडून तिला नमाज पठण करण्यास लावल्याने आणि धर्मांतर करून निकाहसाठी त्याने जबरदस्ती केल्याची फिर्याद पिडीत तरूणीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात इंदोरच्या मौलवींसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पाच आरोपींपैकी दोघांना अटक


दरम्यान कोपरगाव पोलिसांनी सदर गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक देखील केली आहे. हे दोघे आरोपी कोपरगाव येथील राहणारे आहेत. मुख्य आरोपी सायम कुरेशी आणि त्याचा एक सहकारी तसेच मौलवी यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी विविधे पथकं पाठवली आहेत. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 376, 363, 354, 328, 295, 504, 506 आणि 34 प्रमाणे पाचही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गेल्या काही महिन्यांपासून देशात लव्ह जिहाद, हनी ट्रॅपसारख्या घटना घडत आहेत. त्यातच लव्ह जिहाद रोखण्याचं एक मोठं आव्हान आता देशासमोर उभं ठाकलंय का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.


हेही वाचा:


Chandrayaan-3: मिशन चांद्रयान! भारत रचणार आणखी एक इतिहास; पाहा तयारीचे फोटो