Pune Crime News : आपण केलेली चोरी सापडू नये (Pune Crime News) म्हणून पुण्यातील गुन्हेगाराने चांगलीच शक्कल लढवली आहे. मात्र पुणे पोलिसांनी त्याचा हा प्लॅन चांगलाच हाणून पाडला आहे. गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी CCTV फुटेज तपासले जातात. हे चोराला माहित असल्याने त्याने ज्या परिसरात CCTV नाहीत अशा परिसरात जाऊन चोरी करण्याचा प्लॅन केला. त्यानंतर त्याने काही परिसरात चोरीही केली मात्र पोलिसांच्या तावडीतून तो सुटू शकला नाही. पुणे पोलिसांनी तपास करत CCTV नसलेल्या परिसरात चोरी करणाऱ्या चोराला बेड्या ठोकल्या आहेत. 


मागील काही  महिन्यांमध्ये पुणे ग्रामीण आणि अहमदनगर जिल्ह्यातील दुर्गम भागात दरोडा आणि जबरी चोरी प्रमाण वाढले होते. या गुन्ह्यांचा शोध घेत पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 18 गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी 17 लाख 64 हजार रुपयांचे तब्बल 30 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोबतच चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला नगरमधून अटक करण्यात आली आहे. 


आरोपी चकवा देतात पण...


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 गुन्ह्यांमध्ये 7 घरफोडी, 5 दरोडे, 4 जबरी चोरी आणि 2 चोरी या गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपींची झडती घेतली असता, त्याच्याकडून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, चोरलेली दुचाकी, घड्याळ, ब्रेसलेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हल्ली ग्रामीण भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ग्रामीण किंवा दुर्गम भागात जास्त लोकसंख्या नसल्याने शिवाय CCTV कॅमेरे ही नसल्याने ग्रामीण भागात चोरी आणि दरोड्यांचं प्रमाण जास्त आहे. जसे पोलिसांना आरोपींची मोडस ऑपरेंडी माहित असते तशीच आरोपींना सुद्धा पोलिसांच्या तपासाचे मार्ग माहित असतात, म्हणून या आरोपींनी चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यांतील तीन आरोपींना पकडणे शक्य झाले. असं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितलं.


पोलिसांची चोरांवर करडी नजर


सध्या पुणे पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांची गुन्हेगारांवर करडी नजर आहे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शक्कल लढवून गुन्हे करणाऱ्या आरोपींन जेरबंद करण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. 


हेही वाचा-


Pune PMPML : बस चालकांची अरेरावी चालणार नाही! पुणेकरांनो 'या' नंबरवर तक्रार करा अन् मिळवा...