पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पुणे दौऱ्यावरती आहेत. आज(मंळवारी) सकाळी ते शिवाजीनगर येथील निवासस्थान येथून सर्किट हाऊसच्या दिशेने निघाले. त्याचवेळी शिवाजीनगर परिसरातील संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकीस्वाराचा आणि रिक्षाचा अपघात झाला. यावेळी पुण्याच्या पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी तत्परता दाखवत ताफा थांबवून अपघातग्रस्तांची मदत केली. 


यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) अपघात झालेल्या व्यक्तीची विचारपूस केली, त्यांना धीर दिला. ताफ्यातील अँब्युलन्समधील डॉक्टर यांना ताबडतोब उपचार करण्यासाठी देखील त्यांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार आपल्या पुढील नियोजित कामासाठी रवाना झाले, या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 


नेमकं काय घडलं?


या अपघातग्रस्ताना अजित पवार (Ajit Pawar) मदत करताना त्यांच्याशी बोलताना व्हिडिओमध्ये दिसत आहे, एक व्यक्ती अपघात झाल्यावर खाली पडल्याचं दिसतो आहे. यावेळी अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा थांबतो. अजित पवारांचे कर्मचारी, सुरक्षारक्षक अपघातग्रस्त व्यक्तीच्या मदतीला येताना दिसतात. अजित पवार देखील गाडीतून उतरतात आणि कोणाला तरी फोन करून सूचना देताना दिसतात. त्यानंतर ते जखमी व्यक्तीजवळ जातात आणि त्याची विचारपूस करतात.






या अपघातात तो व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचं व्हिडिओमधून दिसते आहे. जखमी व्यक्तीला सर्व प्रकारची मदत करण्याच्या सूचना देऊन अजित पवार (Ajit Pawar) आपल्या पुढील नियोजित कामासाठी रवाना होतात. या व्हिडिओमधून अजित पवारांची कार्यतत्परता दिसून येते आहे, यामुळं त्यांचं कौतुक देखील केलं जात आहे. 


यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) अपघात कसा काय झाला? असे दुचाकीस्वाराला विचारले. त्यावर रिक्षा आडवी आल्याने किरकोळ अपघात झाला. जास्त लागलं नाही फक्त हाताला खरचटलं आणि अंगठ्याला लागलं असल्याचं अपघातग्रस्त व्यक्तीने सांगितलं. मी ठीक आहे, असे दुचाकीस्वाराने अजित पवार यांना सांगितले. अपघातग्रस्तावर ‘संचेती’ रुग्णालयात प्राथमिक उपचार करा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या व त्यानंतर ते आपल्या पुढील कामासाठी रवाना झाले.