ठाणे : लग्नाचे स्वप्न पाहणारे अनेकजण मॅट्रिमोनिअल साईट्सवर नावे नोंदवून आपला जीवनसाथी शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु याचाच फायदा घेत अनेक तोतया त्यांची फसवणूक करुन त्यांना गंडा घालतात. असच एक प्रकरण समोर आलं असून यामध्ये आरोपीने तब्बल 26 महिलांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला गजाआड केलं आहे.

 

हल्ली सर्वत्र धकाधकीचं जीवन सुरु आहे. त्यामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्कही कमी झाल्याने सध्या अनेकांना लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी शोधताना मॅट्रिमोनियल साईट्सची मदत घ्यावी लागते. कोणीही या मॅट्रिमोनीअल साइट्सवर आपले नाव नोंदवून आपल्या आवडीचा साथीदार शोधण्याचा प्रयत्न करतात. पण याचाच गैरफायदा आता अनेकजण घेऊ लागले असून, विधवा आणि घटस्फोटित महिलांना विशेष करून टार्गेट केले जात आहे. पुदुच्चेरी येथे राहणारा 44 वर्षीय प्रजित जोगीश केजे याने अशाच प्रकारे आपले जाळे पसरवत अनेक राज्यातील तब्बल 26 महिलांची दोन कोटी 58 लाख रुपयांची फसणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

आरोपी सध्या पोलीस कोठडीत

 

यामध्ये मुंबई, केरळ, बांगलुरू, कोलकाता सारख्या अनेक शहरात त्याने मॅट्रिमोनिअल साईट्स वर नावे नोंदविलेल्या 26 महिलांना गंडा घातलाय. ठाण्यातील ढोकाळी येथे राहणाऱ्या एका महिलेला देखील त्याने असेच आमिष दाखवत शारीरिक शोषण केले आणि तिच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सचा वापर करून महागड्या वस्तू देखील विकत घेतल्या. आपले पॅरिस येथे हॉटेल होते आणि त्याच्या विक्रीतून आलेले पैसे RBI मध्ये अडकल्याने ते सोडविण्यासाठी पैसे मागत असल्याचा बनाव करुनही त्याने अनेकांना लुटले आहे. कापूरबावडी पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल करून, गुन्हे पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या शिताफीने तपास करत या आरोपीला अटक केली आहे. ठाणे न्यायालयात आरोपीला हजर केले असता त्याला 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांनी दिली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha