पालघर : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी मित्रांकडून घेतलेल्या कर्जाच्या वादातून नौदल सैनिक सूरजकुमार दुबे याची हत्या झाल्याचा संशय पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. प्रकरण अतिशय संवेदनशील असल्याने या निर्घृण हत्येच्या तपासासाठी पालघर पोलिसांनी एकूण 10 पथके तयार केली असून यामध्ये 100 पोलिसांचा समावेश करण्यात आला आहे.
सूरजकुमार दुबे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून केलेल्या निर्घृण हत्येबद्दल पत्रकार परिषदेत पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आज अनेक खुलासे केले. सूरजकुमार दुबे यांच्याकडे एकूण दोन नाही तर तीन मोबाईल क्रमांक होते. सुरजकुमार तिसऱ्या मोबाईल क्रमांकाचा वापर फक्त शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी करीत असे. शेअर मार्केटमध्ये आस्था ट्रेडिंग आणि एंजल ब्रोकिंग या दोन कंपनीच्या माध्यमातून ट्रेडिंग करण्यासाठी 8 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यामध्ये त्यांना प्रचंड नुकसान होऊन मुंबईत असलेल्या दोन बँक खात्यातील कर्जाचे लाखो रुपये संपले होते. तसेच आयएनएस अग्रणीवर असलेल्या मित्राकडून देखील लाखो रुपये त्यांनी उसने घेतले होते. हा मित्र उसने दिलेले पैसे परत करण्यासाठी सूरजकुमारला धमकावत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच साखरपुडा झालेल्या बायकोच्या कुटुंबीयांनी देखील त्याला 9 लाख रुपये दिल्याचे समोर आले आहे. पालघर पोलिसांसमोर आलेल्या या सर्व शक्यतांचा वेगवेगळ्या कोनातून तपास करत असून लवकरच या हत्येचा संपूर्ण उलगडा करणार असल्याचे पालघर पोलीस अधिक्षकानी सांगितले.
15 जानेवारीला झाला होता साखरपुडा
तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे आयएनएस अग्रणी येथे नौसैनिक सूरजकुमार मिथिलेश दुबे याचे 10 लाख रुपयांच्या खडणीसाठी 1 फेब्रुवारीला रिव्हॉल्वरच्या धाकाने अपहरण करून त्याला 5 फेब्रुवारीला पालघर जिल्ह्यातील वेवजी येथील जंगलात 3 अज्ञात व्यक्तींनी अंगावर पेट्रोल टाकून जाळले होते. या घटनेत सूरजकुमार दुबे यांचे मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी निधन झाले. या घटनेचा तपास करताना पालघर पोलिसांच्या हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार सूरजकुमार दुबे हा भारतीय नौदलात तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे सिबिंग सीमॅन पदावर कार्यरत होता. तो एक महिन्याच्या सुट्टीसाठी झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील पूर्वडिहा या आपल्या मूळ गावी गेला होता. त्याचा तिथे 15 जानेवारीला साखरपुडा होऊन एप्रिल महिन्यात विवाह करण्याचे निश्चित झाले होते. 30 जानेवारीला एक महिन्याची सुट्टी पूर्ण होताच सूरजकुमार दुबे रांची येथून विमानाने हैदराबाद व तेथून पुन्हा चेन्नई येथे उतरला. नंतर मात्र त्याच्या दोन्ही मोबाईल नंबरवर संपर्क होत नसल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी पलामु एसपी यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.