सिंधुदुर्ग : विकासकामांना विरोध करायचा आणि उदघाटनावेळी आयत्या बिळावर नागोबा, अशा शब्दांत नारायण राणेंची शिवसेनेवर टीका केली. सिंधुदुर्गात राणेंच्या मेडिकल कॉलेजचे अमित शाह यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी अमित शाह यांच्यासमवेत देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.
...तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती- अमित शाह
नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या लाईफटाईम वैद्यकिय महाविद्यालयाचा उदय़घाटन सोहळा पार पडला आणि व्यासपीठावर आलेल्या उपस्थित मान्यवरांनी राजकीय टोलेबाजीला सुरुवात केली. सदर रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या उभारणीला शिवसेनेचा अधिकाधीक विरोध झाला. कोकणात विमातळ उभारणीलाही शिवसेनेचा मोठा विरोध झाला. पण, खरं म्हणजे विकासकामांना विरोध करायचा आणि उदघाटनांना आयत्या बिळावर नागोबासारखं यायचं म्हणजेच तर शिवसेना अशी बोचरी टीका राणेंनी केली.
राणेंचा प्रहार, शाहंची तोफ... निशाण्यावर शिवसेना
एकिकडे राणेंनी शिवसेनेवर शाब्दिक प्रहार केलेला असतानाच तिथं दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहसुद्धा शिवसेनेवर तोफ डागताना दिसले.
'दाराआड शिवसेनेसोबत कधीच चर्चा झाली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 'मी आज महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, आपण जो जनादेश दिला होता त्याचा अनादर करत त्याच्या विरोधात हे सरकार आलं आहे', असं ते म्हणाले. भाजप शिवसेनेच्या वाटेवर चालली असती तर शिवसेना महाराष्ट्रात उरलीच नसती, असा घणाघात अमित शाहंनी केला आहे. महाविकासआघाडी आणि शिवसेनेवर शाहांनी जोरदार हल्ला केला. राणेंचा प्रहार आणि अमित शहांनी डागलेली शाब्दिक तोफ पाहता यावर आता शिवसेना नेते किंवा पक्ष नेतृत्त्व काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.