Akola Crime News अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे. अकोल्यातल्या मोर्णा नदीपात्रात एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आलाय. वय वर्ष अवघ्या एक वयोगटाच्या आतील हा चिमुकला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई सुरू केली आहे. यात नदीपात्रातील चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढून अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अद्याप या चिमूकल्याची ओळख पटली नसून पोलीस त्या दिशेने तपास करत आहे.

  


 मोर्णा नदीपात्रात आढळला चिमुकल्याचा मृतदेह


दरम्यान, या चिमुकल्याचा मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून नदीच्या पाण्यात बुडाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अद्यापपर्यंत या चिमुकल्याची ओळख समोर आली नसून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या चिमुकल्याच्या मृत्युबद्दल घातपाताची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.  मात्र, वैद्यकीय अहवालानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.


दरम्यान, अकोला शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळील मोर्णा नदीपात्रात आज या चिमुकल्याचा मृतदेह दिसून आला आहे. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक कृतीची नोंद केली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहे.


पातुरमध्ये ट्रक व कारचा अपघात


अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात भरधाव येणाऱ्या ट्रक आणि कारचा भीषण अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मतदकार्य सुरू केले होते. त्यानंतर, पोलिसांनीही (Police) घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला आहे. जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. 


तांदुळ घेऊन जाणारा ट्रक पुलावर कोसळला


अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी फाट्यावरील एका नदीच्या पुलावरून दोन्ही वाहनं जात असताना भीषण अपघात झाला, शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती. नदीवरील पूल छोटा असल्यामुळे ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक कारवर पलटी झाला. अरुंद रस्त्यावरुन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नातून ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले अन् शेजारुन जात असलेल्या कारवर हा तांदळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक कोसळला. या अपघातात ट्रक खाली कार दबल्या गेल्यानं कारमधील प्रवासी वाहनात अडकले होते.


मात्र, स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. सुदैवानं या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नसून कारमधील 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत. चान्नी फाट्यावरील अरुंद पुलावरच ट्रक कोसळल्याने ट्रकमधील तांदुळाचे पोते पुलाखाली पडले आहेत. तर, ट्रक शेजारुन जाणारी कार ट्रकच्या ओझ्याखाली दबल्याने तिचे मोठे नुकसान झालं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या