Raigad Suspicious Boat : रायगडच्या (Raigad) हरिहरेश्वर जवळ एक अज्ञात बोट आढळली. इतकंच नाही तर त्या बोटीत शस्त्रास्त्रं सापडल्यानं खळबळ उडाली होती. त्यानंतर अख्खा महाराष्ट्र (Maharashtra) हायअलर्टवर गेला आहे. कोकण, मुंबईच्या (Mumbai) समुद्रकिनाऱ्यांसह सर्व ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. रायगडमधील संशयित बोटप्रकरणात आता केंद्र सरकारची एन्ट्री झाली असून या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता एनआयएची (NIA) टीम रायगडमध्ये दाखल झाली आहे. एनआयए टीमकडून
संशयित बोटीचा तपास सुरु आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) बोट आढळल्यानंतर या प्रकरणाचा तपास एटीएस (ATS) कडे वर्ग करण्यात आला होता. एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल (ATS Chief Vineet Agrawal) यांनी घटनास्थळी जाऊन बोटीची पाहणीही केली. 


रायगड नजिक हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेली संशयास्पद बोट (Raigad Suspicious Boat) ओमान देशातील असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या स्पीड बोटीवर आढळून आलेल्या नावाच्या कंपनीची नोंदणी ब्रिटनमधील असल्याचीही माहिती मिळत आहे. ही स्पीड बोट ओमानजवळ समुद्रात अडकली होती, या बोटीतील व्यक्तींना ओमानजवळच रेस्क्यू करण्यात आलं होतं. त्यानंतर ही बोट त्याठिकाणी नांगर टाकून उभी करण्यात आली होती. त्यानंतर ही बोट समुद्रातून वाहत रायगडजवळ आली असावी, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


एनआयएकडे तपासाची सूत्र 


सध्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही हयगय न करता आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. त्यासाठी एनआयएचं एक पथक आज रायगडला पोहोचलं आहे. तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईपासून सुमारे 190 किमी अंतरावर असलेल्या श्रीवर्धन परिसरात काही स्थानिकांनी संशयास्पद बोट पाहिली आणि सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली. त्यानंतर तात्काळ रायगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांची बोटीची पाहणी केली. तर त्यावेळी बोटीवर 3 एके-47 आढळून आल्या. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली. 


संशयास्पद बोटीवर शस्त्रास्त्रं 


रायगडमधील श्रीवर्धनमध्ये आढळलेल्या संशयास्पद बोटीवर दोन  ते तीन एके-47 रायफल आढळल्या आहेत. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्याही त्या बोटीमध्ये मिळाल्यात. त्याशिवाय या बोटीवर लाइफजॅकेट आणि इतर साहित्य आढळून आलं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :