WPI Inflation:  किरकोळ महागाई दरातील घसरणीनंतर घाऊक मूल्य सूचकांक आधारीत महागाई दरातही (Wholesale inflation Rate) घट झाली आहे. जुलै महिन्यात घाऊक महागाई दर 13.93 टक्के इतका नोंदवण्यात आला. तर, जून महिन्यात हा घाऊक महागाई दर 15.18 टक्के इतका नोंदवण्यात आला. मे 2022 मध्ये हा दर 15.88 टक्क्यांच्या आसपास होता. जुलै महिन्यात मागील पाच महिन्यातील सर्वात कमी घाऊक महागाई दर नोंदवण्यात आला आहे. 


जुलै महिन्यातील घाऊक महागाईचे आकडे हे सरकारला दिलासा देणारे ठरले आहेत. त्याआधी सलग तीन महिने घाऊक महागाई दर 15 टक्क्यांहून अधिक नोंदवण्यात आला होता. 


सलग दुसऱ्या महिन्यात घाऊक महागाई दरात घट नोंदवण्यात आली आहे. मात्र, सलग 14 महिन्यांपासून घाऊक महागाई दर हा 10 टक्क्यांहून अधिक नोंदवण्यात आला आहे. मागील एक वर्षांपासून घाऊक महागाई दर सातत्याने वाढत आहे. मात्र, जून आणि जुलै महिन्यात घाऊक महागाई दरात घट नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात हा दर 13.43 टक्के इतका होता. त्यानंतर रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्याने कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले. त्याशिवाय जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले. त्याच्या परिणामी महागाई दरात मोठी वाढ झाली. मार्च महिन्यात घाऊक महागाई दरात एक टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. या महिन्यात 14.55 टक्के इतका घाऊक महागाई दर नोंदवण्यात आला. 


जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात खाद्य महागाई दरात घट झाली आहे. जुलैमध्ये खाद्य महागाई दर 9.41 टक्के इतका नोंदवण्यात आला. तर, जून महिन्यात हा दर 12.41 टक्के होता. जुलै महिन्यात भाज्यांचा महागाई दर 18.25 टक्के होता. तर, जून महिन्यात हा दर 58.75 टक्के इतका होता. धान्य, गहू, डाळ आणि फळांचे दर जुलै महिन्यात वाढले आहे. 


किरकोळ महागाई दरातही घट 


भारतात किरकोळ महागाई दरात घट होऊ लागली असल्याचे चित्र आहे. जगातील अनेक देश महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. भारतात किरकोळ महागाई दरात घट झाली असून 6.71 टक्क्यांवर आला आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या 6 टक्के दराच्या मर्यादेपेक्षा हा दर अधिक आहे. याआधी जून महिन्यात किरकोळ महागाई दर काही प्रमाणात कमी होऊन 7.01 टक्के इतका झाला होता. मे महिन्यात किरकोळ महागाई दर 7.04 टक्के इतका झाला होता. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर 7.79 टक्के इतका होता. रिझर्व्ह बँके किरकोळ महागाई दराच्या आधारे व्याज दराबाबत निर्णय घेते.