Ambuja Cement : जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी Holcim Group भारतातून आपला गाशा गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. जवळपास 17 वर्षांपासून ही सिमेंट कंपनी भारतात व्यवसाय करत आहे. कंपनीने आपल्या कोअर मार्केटवर लक्ष केंद्रीत करण्याची रणनिती आखली आहे. त्यानुसार आता ही कंपनी भारतातून आपला गाशा गुंडाळणार आहे. या कंपनीचे अंबुजा सिमेंट (Ambuja Cement) आणि एसीसी लिमिटेड (ACC) हे सिमेंट ब्रॅण्ड आहेत. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  Holcim Group आपला भारतातील व्यवसाय विकण्यासाठी जेएसडब्लू (JSW) आणि अदानी (Adani Group)सह इतर कंपन्यांसोबत चर्चा करत आहे. जेएसडब्लू आणि अदानी समूहाने नुकतंच सिमेंट व्यवसायात एन्ट्री घेतली आहे. दोन्ही कंपन्यांकडून सिमेंट बाजारपेठेवर वर्चस्व मिळवण्यासाठी आक्रमक योजना तयार आहेत. श्री सिमेंट सारख्या स्थानिक कंपनीसोबतही संपर्क साधण्यात आल्याची चर्चा आहे. 


भारतीय सिमेंट बाजारात कोणाचे वर्चस्व?


भारतीय सिमेंट बाजारात सध्या आदित्य बिर्ला समूहाची  अल्ट्राटेक सिमेंट कंपनी ही मोठी कंपनी आहे. अल्ट्राटेक कंपनीजवळ दरवर्षी 117 दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. Holcim Group ची दोन्ही लिस्टेड कंपन्या अंबुजा सिमेंट आणि एसीसी लिमिटेड या दोन्हींची संयुक्त क्षमता 66 दशलक्ष टन प्रति वर्ष इतकी आहे. कोणताही समूह या कंपन्यां खरेदी करेल, ती कंपनी एक फटक्यात भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सिमेंट कंपनी होईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कंपन्यांदेखील या व्यवहारात लक्ष देत आहेत. 


सन 2015 मध्ये स्वित्झर्लंडमधील कंपनी Holcim चे प्रतिस्पर्धी फ्रेंच कंपनी Lafarge सोबत विलीनीकरण झाल्यानंतर LafargeHolcim नावाने सिमेंट आणि इमारत बांधकाम साहित्यातील मोठी युरोपीयन कंपनी तयार झाली होती. मात्र, भारतासह काही आशियाई-युरोपीयन देशांमधील कायद्यांमुळे Holcim Group या नावाने बाजारपेठेत प्रवेश केला होता.


किती भागिदारी?


भारतीय बाजारपेठेत Holcim कंपनीची फ्लॅगशिप कंपनी Ambuja Cement आहे. यामध्ये प्रमोटर्सचा 63.1 टक्के भागिदारी आहे. Holcim कडे ही भागिदारी Holderind Investments Limited च्या माध्यमातून आहे. एसीसी लिमिटेड मध्ये अंबुजा सिमेंट कंपनीची 50.05 टक्के भागिदारी आहे. एसीसीमध्ये Holderind Investments Limited ची प्रत्यक्ष भागिदारी 4.48 टक्के आहे. Holcim सन 2018 पासून दोन्ही ब्रॅण्डचे विलीनीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही.