World Bank On Global Economy: जगभरात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मंदी (Recession) येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे जगभरातील अनेक वित्तीय संस्थांनीदेखील यंदा मंदीचे सावट असणार असल्याचा इशारा दिला आहे. आता, जागतिक बँकेनेदेखील (World Bank) आर्थिक मंदीचा इशारा दिला आहे. अमेरिका (US), युरोप (Europe) आणि चीन (China) या सर्व प्रमुख आणि आघाडीच्या अर्थव्यवस्थांच्या विकास दरात घट झाल्यामुळे चालू वर्षात जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असणार असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे.
जागतिक बँकेने आपल्या वार्षिक अहवालात हा अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक बँकेने 2023 साठी जागतिक विकास दर 1.7 टक्क्यांवर आणला आहे. याआधी हा दर 3 टक्के इतका होता.
जागतिक बँकेने मंगळवारी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जागतिक बँकेने वर्तवलेला अंदाज खरा ठरल्यास तीन दशकांत ही तिसऱ्यांदा आर्थिक विकास दर सर्वात कमकुवत असणार असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी 2008 मधील जागतिक आर्थिक मंदी, वर्ष 2020 मध्ये कोरोना महासाथीमुळे जागतिक विकास दरात मोठी घसरण झाली होती.
जागतिक बँकेच्या अहवालानुसार अमेरिका या वर्षी मंदी टाळू शकते. पण अमेरिकेचा विकास दर केवळ 0.5 टक्केच राहण्याचा अंदाज आहे.
कोरोना महासाथ आणि युक्रेन युद्धामुळे अमेरिकेतील पुरवठा साखळीवर परिणाम होऊ शकतो. तर, चीनच्या कमकुवत अर्थव्यवस्थेचा फटका युरोपला सहन करावा लागू शकतो. जागतिक बँकेने पुढे म्हटले की, अमेरिका आणि युरोपमधील वाढत्या व्याजदरांमुळे गरीब देशांमधील गुंतवणूक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गरीब देशांमध्ये गुंतवणूक कमी झाल्याने संकट निर्माण होऊ शकते.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) देखील 2023-24 मध्ये भारताचा आर्थिक विकास दर 6.1 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जे 2022-23 मध्ये 6.8 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. कच्च्या तेलाचे वाढलेले दर, कठोर पतधोरण आदी विविध कारणांमुळे भारताचा आर्थिक विकास दर घटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
येत्या दोन वर्षांत भारतात महागाई कमी होण्याची शक्यता IMFने व्यक्त केली आहे. मात्र, कोरोना महासाथीच्या संकटाचा व्यापार आणि आर्थिक विकासावर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही IMF ने व्यक्त केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: