नवी दिल्ली : देशात चलनात असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटा आरबीआयने परत मागवल्यामुळे देशभरात पुन्हा नोटबंदी (Demonitizaton) चर्चा रंगली होती. त्यानंतर, आता चलनातून 2 हजार रुपयांची नोटही बंद होते की काय,असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, याबाबत आरबीआयने (RBI) स्पष्टीकरण देताना 2 हजार रुपयांची नोट चलनात कायम असल्याचे स्पष्ट केले होते. आता, आरबीआयकडून 2 हजार रुपयांच्या किती नोटा परत आल्या व सध्या देशातील चलनात असलेल्या या नोटांबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, दोन हजार रुपयांच्या 97.76 टक्के नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत. पण, अद्यापही 7 हजार 961 कोटी रुपयांच्या नोटा चलनात असल्याची आरबीआयची माहिती आरबीआयने दिली. 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी देशातील चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा परत मागवल्या होत्या. आरबीायच्या या घोषणेवेळी बाजारातील चलनात 3.56 लाख कोटी रुपयांच्या 2 हजारांच्या नोटा होत्या. मात्र, आता 30 एप्रिल रोजी आरबीआयने आकडेवारी जाहीर करुन सद्यस्थितीत 2 हजार रुपयांच्या किती नोटा बाजारात आहेत, त्यांचे वर्तमान मुल्य किती, याची माहिती दिली आहे. त्यानुसार, देशातील चलनात सध्या 7,961 कोटी रुपये आहेत. म्हणजेच, या आकडेवारीनुसार गत वर्षभरात तब्बल 97.76 टक्के नोटा आरबीआयकडे परत आल्या आहेत. दरम्यान, सध्या 2 हजार रुपयांची नोट वैध मानली जात असून चलनात अस्तित्वातही आहे. मात्र, ज्यांच्याकडे ह्या नोटा आहेत, त्यांनी त्या जमा करणेही आवश्यक आहे. 


नोटा बदलून घेण्याचे आवाहन कायम


आरबीआयकडून 30 एप्रिल 2024 पर्यंतची आकडेवारी जारी करण्यात आली असून देशातील चलनात असलेल्या 2 हजार रुपयांचा तपशील देण्यात आला आहे. तसेच, दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याचे आरबीआयचे आवाहन आजही कायम असल्याचे सांगण्यात आले. आरबीआयच्या 19 कार्यालयात किंवा स्पीड पोस्ट करत नागरिकांना 2 हजार रुपयांच्या नोटा बदलवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


2 हजारांची गुलाबी नोट लवकरच इतिहासजमा 


दरम्यान, आरबीआयकडून नोव्हेंबर 2016 मध्ये 1000 व 500 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. देशात नोटबंदीच्या या घोषणेनं चांगलाच गदारोळ माजला होता. त्यानंतर, भारत सरकारने 2000 रुपयांची नोट चलनात आणली होती. नव्याने चलनात आलेल्या या नोटेला पाहूनही नेटीझन्सने आनंद व्यक्त केला होता, तर सोशल मीडियातून मिम्सही व्हायरल झाले होते. मात्र, काही वर्षांतच या नोटा आरबीआयने परत मागवल्याने 2 हजारांची नोटही लवकरच इतिहासजमा होईल, असेच दिसून येत आहे. 


हेही वाचा


फॉर्म-16 म्हणजे नेमकं काय रे भाऊ, या कागदपत्रामुळे कर कसा वाचू शकतो?