High speed Rail : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रकल्प (First bullet train project) पूर्ण करण्याचे काम जोरात सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. या ट्रेनची चाचणी 2026 मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याआधी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (MAHSR) कॉरिडॉरवरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून एक मोठे पाऊल उचलले जात आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनला 28 सिस्मोमीटर सिस्टीमने सुसज्ज करण्याची घोषणा केली आहे.


बुलेट ट्रेनला सिस्मोमीटर प्रणाली बसवणार 


रेल्वे मंत्रालयाने उचललेले हे पाऊल प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. भारतातील या पहिल्या बांधकामाधीन बुलेट ट्रेनला सिस्मोमीटर प्रणालीने सुसज्ज करण्यामागचा मुख्य उद्देश भूकंप लवकर ओळखणे हा आहे. याद्वारे हायस्पीड रेल्वे प्रवासादरम्यान संभाव्य धोके कमी करण्यासाठी उपाययोजना करता येतील.


NHSRCL ने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालयाने जे 28 सिस्मोमीटर बसवण्याची योजना आखली आहे, त्यापैकी महाराष्ट्र आणि गुजरातमधील वेगवेगळ्या शहरांची निवड करण्यात आली आहे. या शहरांमधील निवडक ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. ही स्थाने हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरला जोडलेल्या विशिष्ट शहरांच्या लगतच्या भागात आहेत. एकूण 28 पैकी 8 सिस्मोमीटर सिस्टीम महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर सारख्या विशेष ठिकाणी बसविण्याचे नियोजित आहे.
गुजरातमधील वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, महेमबाद आणि अहमदाबाद आदी शहरांमध्ये एकूण 14 सिस्मोमीटर बसवले जाणार आहेत. यासोबतच उर्वरित सहा भूकंप मापक यंत्रे भूकंपप्रवण भागात बसवण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील खेड, रत्नागिरी, लातूर आणि पांगरी तसेच गुजरातमधील आडेसर आणि जुने भुज आदी ठिकाणांचा समावेश आहे.


मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल (MAHSR) कॉरिडॉरच्या शेजारील भागात गेल्या 100 वर्षात 5.5 पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपांचे सर्वेक्षणही करण्यात आले. इतकेच नाही तर सविस्तर सर्वेक्षणासोबतच अत्यंत कमी कंपन किंवा तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांचा संपूर्ण अभ्यास करण्यात आला. या काळात मातीची उपयुक्तताही तपासण्यात आली. या सर्व अहवालानंतरच, MAHSR कॉरिडॉरला लागून असलेल्या भागांची भूकंपमापक यंत्रे बसवण्यासाठी निवड करण्यात आली.


महत्वाच्या बातम्या:


Exclusive: नागपूर-मुंबई प्रवास सुसाट! बुलेट ट्रेन प्रकल्पाची DPR मधील काही वैशिष्ट्ये 'एबीपी माझा'च्या हाती