Wheat procurement : यावर्षी देशात मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी (Wheat procurement) केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत विक्रमी गव्हाची खरेदी झाली आहे. गहू खरेदीनं मागील वर्षीचा विक्रम मोडला आहे. आत्तापर्यंत सरकारनं (Govt) 262.48 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी केली आहे. गहू खरेदीमुळे 22.31 लाख शेतकऱ्यांना (Farmers) फायदा झाला आहे. तर 59,715 कोटी रुपये किमान आधारभूत किंमतीच्या रुपात शेतकऱ्यांना मिळाले आहेत. 


आतापर्यंत 262.48 लाख मेट्रिक टन गहू खरेदी 


रब्बी विपणन हंगाम 2024-25 दरम्यान गव्हाची खरेदी देशभरातील प्रमुख खरेदी करणाऱ्या राज्यांमध्ये सुरळीतपणे सुरू आहे.  या वर्षात आतापर्यंत 262.48 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला आहे. केंद्रीय साठ्यात गेल्या वर्षी झालेल्या एकूण 262.02 लाख मेट्रिक टन खरेदीला मागे टाकत यावर्षी गव्हाची खरेदी झाली आहे. रब्बी विपणन हंगाम 2024-25 मध्ये एकूण 22.31 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला असून 59,715 कोटी रुपये किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) रुपात प्रदान करण्यात आले आहेत. 


गहू खरेदीमध्ये प्रमुख योगदान पाच राज्यांचे


गहू खरेदीमध्ये प्रमुख योगदान पाच राज्यांचे आहे.  पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी अनुक्रमे 124.26 लाख मेट्रिक टन, 71.49 लाख मेट्रिक टन, 47.78 लाख मेट्रिक टन, 9.66 लाख मेट्रिक टन आणि 9.07 लाख मेट्रिक टन गहू खरेदी केला आहे. पंजाब आणि हरियाणा ही दोन राज्य गहू खरेदीत आघाडीर असणारी राज्य आहेत. दरवर्षी या दोन राज्यातून मोठ्या प्रमाणात गव्हाची खरेदी होत असते. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा मिळतो. 


तांदळाचीही मोठ्या प्रमाणात खरेदी


सध्या धान खरेदीही सुरळीत सुरु आहे. खरिप विपणन हंगाम (KMS) 2023-24 दरम्यान 489.15 लाख मेट्रिक टन तांदुळाच्या समतुल्य 728.42 लाख मेट्रिक टन धान आतापर्यंत 98.26 लाख शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्यात आले आहे. 1,60,472  कोटी रुपये किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) रुपात प्रदान करण्यात आले आहे. उपरोक्त निर्देशित खरेदी केल्यामुळे, केंद्रीय साठ्यामध्ये सध्या गहू आणि तांदूळ यांचा एकत्रित साठा 600 लाख मेट्रिक टनाच्या पुढे गेला आहे. यामुळं देशाला प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजना (PMGKAY) आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत नागरिकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि बाजारातील धान्य उपलब्धतेसाठी देखील सुखावह स्थिती निर्माण झाली आहे.


महत्वाच्या बातम्या:


सरकार गेल्या वर्षीचा गहू खरेदीचा विक्रम मोडणार, आत्तापर्यंत कोणत्या राज्यातून किती खरेदी?