Changes from 1st June: एक जून पासून काही नियम बदलणार आहेत. हे नियम बँकिंग आणि इतर आर्थिक गोष्टींशी निगडीत असल्याने त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. जाणून घ्या जून महिन्यात तुमच्या खिशावर कोणता परिणाम होणार आहे. st
थर्ड पार्टी विमा महाग
एक जून 2022 पासून थर्ड पार्टी विमा होणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला अधिक प्रीमियम भरावा लागणार आहे. हा नवा नियम चार चाकीच नव्हे तर दुचाकींनाही लागू होणार आहे. केंद्र सरकारने बुधवारी थर्ड पार्टी मोटर व्हेइकल इन्शुरन्सच्या प्रीमियम दरवाढीला मंजुरी दिली आहे.
इंजिनच्या क्षमतेनुसार असणार प्रीमियम
मोटार विम्याच्या प्रीमियममध्ये यापूर्वी 2019-20 या वर्षासाठी वाढ करण्यात आली होती. नव्या नियमानुसार आता 1000 सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या वाहनांना थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी 2,094 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. याआधी हा प्रीमियम 2019-20 मध्ये 2072 रुपये इतका होता.
तर, 1000 सीसी ते 1500 सीसी कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम 3221 रुपयांवरून 3416 रुपये करण्यात आला आहे. 1500 सीसी पेक्षा जास्त वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये 7890 रुपयांवरून 7897 रुपयांपर्यंत किरकोळ वाढ करण्यात आली आहे.
सरकारने दुचाकींच्या थर्ड पार्टी विमा प्रीमियमच्या दरातही बदल केला आहे. अधिसूचनेनुसार, 1 जून 2022 पासून, 150 cc ते 350 cc पर्यंतच्या बाईकसाठी 1,366 रुपये आकारले जातील. तर 350 cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठी विमा प्रीमियम 2,804 रुपये निश्चित करण्यात आला आहे.
गोल्ड हॉलमार्किंग असणार पुढील टप्पा
गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा 2022 मध्ये 1 जून 2022 पासून सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 20, 23 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसह आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. गोल्ड हॉलमार्किंगच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात नोडल एजन्सी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (BIS) 23 जून 2021 पासून देशातील 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केली होती.
गृह कर्ज महाग होणार
तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून गृह कर्ज घेणार असाल किंवा घेतले असेल तर तुमचा खर्च आणखी वाढणार आहे. एसबीआयने गृह कर्ज एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिग रेट (EBLR) 40 बेसिस पॉईंटने वाढवला आहे. हा रेट आता 7.05 टक्के इतका झाला आहे. तर, आरएलएलआर 6.65 टक्के प्लस सीआरपी असणार आहे. नवीन दर एक जून 2022 पासून लागू होणार आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक शुल्क लागू
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) दिलेल्या माहितीनुसार, Aadhaar Enabled Payment System (AEPS) साठी शुल्क लागू करण्यात आले आहे. 15 जून 2022 पासून हे शुल्क लागू होणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारतीय पोस्ट खात्याची एक सहाय्यक कंपनी असून पोस्ट विभागाकडून संचलित केली जाते.
नव्या नियमांनुसार, दर महिन्याला पहिले तीन AEPS व्यवहार विनामूल्य असतील, ज्यात AEPS रोख पैसे काढणे, AEPS रोख ठेव आणि AEPS मिनी स्टेटमेंट यांचा समावेश आहे. विनामूल्य व्यवहारांनंतर, प्रत्येक रोख पैसे काढणे किंवा रोख ठेवीवर 20 रुपये अधिक GST लागू होईल, तर मिनी स्टेटमेंट व्यवहारावर 5 रुपये अधिक GST इतके शुल्क लागू होतील.