India and Pakistan Trade : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांत भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार जवळपास शून्य राहिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, पाकिस्तानमधून भारताची आयात शून्य राहिली. तर भारताने पाकिस्तानला 235 दशलक्ष डॉलर्सचा माल निर्यात केला आहे. भारत मोठ्या प्रमाणात अनेक वस्तुंची पाकिस्तानमध्ये निर्यात करतो. तसेच भारतातही पाकिस्तानमधून काही वस्तूंची आयात केली जाते. जाणून घेऊयात या दोन्ही देशांमधील व्यापाराच्या संदर्भातील माहिती.
1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण आहेत. दहशतवाद, सीमेवरील चकमकी आणि राजकीय मतभेद यांचा अनेकदा दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम झाला आहे. मात्र, शत्रुत्व असले तरी दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अबाधित राहिले असले तरी दोन्ही देशांतील संबंध व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले तर अलीकडच्या काळात व्यापारी घडामोडींमध्ये मोठी घट झाली आहे.
सध्या दोन्ही देशामधील व्यवसायाची स्थिती काय?
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार जवळपास नगण्य राहिला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, पाकिस्तानमधून भारताची आयात शून्य राहिली. तर भारताने पाकिस्तानला 235 दशलक्ष डॉलर किमतीच्या वस्तूंची निर्यात केली आहे. ज्यात प्रामुख्याने साखर आणि औषधी उत्पादनांचा समावेश होता. गेल्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, भारताने पाकिस्तानमधून फक्त 3 दशलक्ष डॉलरर्स किमतीच्या वस्तूंची आयात केली होती. ज्यामध्ये प्रामुख्याने काही कृषी वस्तूंचा समावेश होता.
दोन्ही देशांमध्ये कोणत्या वस्तूंची आयात आणि निर्यात केली जाते?
भारत पाकिस्तानमधून खनिज तेल, तांबे, फळे, सुका मेवा, मीठ, सल्फर, प्लास्टर सामग्री आणि कापूस आयात करतो. तर भारत पाकिस्तानला रसायने, भाज्या, प्लास्टिक उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, औषधी आणि साखर निर्यात करतो.
2019 नंतर व्यापारी संबंध बदलले
फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान व्यापार संबंध बदलले आहेत. या हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानकडून मोस्ट फेव्हर्ड नेशन (MFN) दर्जा काढून घेतला. यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंधही स्थगित केले. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण राजकीय वातावरण आणि भारताने कलम 370 हटवल्यानंतर व्यापारी संबंध आणखी बिघडले. शत्रुत्व असले तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यात काही वस्तूंसाठीचे व्यापारी संबंध अजूनही अस्तित्वात आहेत. भारताकडून निर्यात होणारी औषधी उत्पादने आणि साखर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची आहे.
राजकीय तणाव कमी झाल्यास दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सुधारु शकतात
राजकीय तणाव कमी झाला तरच दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध सुधारू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या व्यापाराचे आकडे अत्यल्प आहेत, पण व्यापारी संबंध सुधारण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. भारत-पाकिस्तान व्यापार संबंध दाखवतात की राजकीय मतभेद जरी खोल असले तरी काही वस्तूंची परस्पर गरज दोन्ही देशांना व्यापार करण्यास भाग पाडू शकते.