Vinayak Raut on Ladki Bahin Yojana : केवळ विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होण्यासाठी महिलांना पैसे दिले आहेत. नव्याने चौकशी झाल्यानंतर 60 लाखाहून अधिक महिला लाडकी बहिण योजनेतून बाद होतील असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केलं. मुंबई गोवा महामार्गाकडे केंद्र सरकारच जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ठेकेदारांचे हित होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत असल्याचे विनायक राऊत म्हणाले. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिल जाते. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं आमचं सरकार आल्यास 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती.
चिपळूणमधील उड्डाणपुलाच्या दुर्घटनेला ठेकेदार आणि अधिकारी जबाबदार
चिपळूणमधील उड्डाणपुलाच्या दुर्घटनेला ठेकेदार आणि अधिकारी जबाबदार असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. अधिकाऱ्यांच्या हट्टाने शहरातील उड्डाणपुलाची नवी डिझाईन करुन चिपळूणकरांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे विनायक राऊत म्हणाले. शिर्डीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला विनायक राऊत यांनी प्रतिउत्तर दिले. या कार्यक्रमात येऊन त्यांनी उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल बोलावं लागतं याचाच अर्थ राज्यात उध्दव ठाकरे यांचे वर्चस्व आहे. हे मान्य करावं लागेल असे राऊत म्हणाले. राज्यातील इतर घटनांवर न बोलता ते फक्त टीका करतात, असेही राऊत म्हणाले. निधीच्या बाबतीत महाराष्ट्राला डावललं जात आहे. यावर न बोलता उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करणार असतील तर त्यांनी वारंवार महाराष्ट्रात यावं असेही राऊत म्हणाले.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची नैतिकता अजित पवारांकडे नाही
शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भूमिका अद्याप तरी घेतलेली नाही. ती कार्यकर्त्यांची भावना होती. स्वबळावर लढण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही विनायक राऊत म्हणाले. सुरेश धस यांनी बीडमधील प्रकरण बाहेर काढले आहे. त्यांच्यावर टीका करण्याऐवजी पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्या कामाची माहिती घ्यावी असंही राऊत म्हणाले. सत्याची बाजू घेतली म्हणून पंकजा मुंडेंचा तिळपापड होत असेल तर त्यांना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही असंही विनायक राऊत म्हणाले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची नैतिकता अजित पवारांकडे नाही असेही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या: