Vegetable Price News : सध्या भाजीपाल्यांच्या दरात (Vegetable Price) वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी (Farmers) ही दिलासादायक बातमी आहे. कारण त्यांना आर्थिक फायदा होत आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना या दरवाढीचा फटका बसत आहे. दरम्यान, सध्या भाजीपाल्यांच्या दरात का वाढ होतं आहे? याबाबत तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
भाज्यांच्या दरात का होतेय वाढ?
सध्या काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिलत आहे. याचा परणाम भाजीपाल्यांच्या पिकावर होताना दिसत आहे. त्यामुळं भाज्यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या एक-दोन आठवड्यात अनेक ठिकाणी भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. तापमानवाढीचा भाजीपाला पिकांना मोठा फटका बसलाय. अशा स्थितीत भाजीपाला बाजारात पोहोचू शकत नसल्याने भाजीपाल्यांची आवकही कमी होत आहे. एवढेच नाही तर तीव्र उष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे बाजारात ठेवलेला भाजीपाला लवकर खराब होत आहे. सध्या बटाटे, टोमॅटो, कांदा यांसारख्या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, उन्हाळ्यात सर्वत्र भाज्यांचा तुटवडा असतो. मात्र, यंदा पावसाळा सुरु झाला तरी भाज्यांची टंचाई पाहायला मिळत आहे. यावेळी काही भागात मान्सूनचा पाऊसही उशिराने दाखल झाला आहे. त्यामुळं देखील पिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या हंगामातील पावसात 18 टक्के तूट असल्याचं पाहायला मिळत आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यास भाज्यांचे दर कमी होतील
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, उष्मा आणि कमी पाऊस यामुळे भाजीपाला आणि फळांच्या पिकांवर परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यास ही समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे भाज्यांचे दरही कमी होऊ शकतात. सध्या काही भागातत चांगला पाऊस झाला आहे. अनेक भागात चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ
दरम्यान, सध्या टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ दक्षिणेकडील राज्यांमध्ये झाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळं आणि मान्सूनचे उशिरा आगमन यामुळं भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. कडक उन्हामुळं भाजीपाला खराब होऊ लागला आहे. त्यामुळं भावात वाढ होत असल्यानं आहे. मात्र येत्या आठवडाभरात चांगला पाऊस झाल्यास भाजीपाल्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: