मुंबई : तुम्ही जर घर घ्यायचं प्लॅनिंग करत असाल, आणि कर्जासाठी बँकेकडे अर्ज करणार असाल तर ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने होम लोन संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने त्यांच्या होम लोनच्या व्याजदरात कपात केली आहे. या बँकेचे होम लोन आता 6.40 टक्के व्याजदराने मिळणार आहे. आतापर्यंतचे हे सर्वात कमी व्याजदर आहे. 


युनियन बँक ऑफ इंडियाने जारी केलेला हा व्याजदर बुधवार, 27 ऑक्टोबरपासून लागू केला जाणार आहे. होम लोनसाठी नव्याने अर्ज करणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच जे ग्राहक आपले जुने कर्ज त्यांच्या बॅलेन्ससह ट्रान्सफर करण्याची विनंती करतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं. 


दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जे ग्राहक होम लोनसाठी अर्ज करणार आहे त्यांच्यासाठी ही खास सुवर्णसंधी आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या होम लोनची मागणी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर केली  जाते. 


भारतीय पोस्टकडून आता होम लोन मिळणार
ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना होम कर्ज घेताना अनेक अडचणी येतात. या अडचणी लक्षात घेऊन इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेकडून आता ग्रामीण भागातील ग्राहकांना काही मिनिटांत होम लोन मिळणार आहे. यासाठी इंडिया पोस्ट बॅंकने एचडीएफसीसोबत (HDFC) भागीदारी केली. या अंतर्गत पेमेंट बँकेच्या सुमारे 4.7 कोटी ग्राहकांना होम लोनची सुविधा उपलब्ध होणार आहे. गावातील ग्राहकांची गरज लक्षात घेऊन पोस्ट ऑफिसने ही भागीदारी केल्याचे समजत आहे. 


एचडीएफसी बँक आपल्या 650 शाखांचे देशव्यापी नेटवर्क आणि 1.36 लाख बँकिंग अॅक्सेस पॉईंट्सच्या मदतीने ग्राहकांना कर्ज प्रदान करणार आहेत. आर्थिक समावेशनासाठी कर्जाची उपलब्धता आवश्यक आहे. कारण, कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था ग्राहकांच्या महत्त्वपूर्ण वर्गाला गृहकर्ज देत नाही, असे इंडियन पोस्ट पेमेंट बॅंकचे व्यवस्थापकीय संचालक जे वेंकटरामू म्हणाले आहेत.


महत्वाच्या बातम्या :