Lithium-Ion Cell Unit In Gujarat : टाटा समूह (Tata Group) गुजरातमध्ये 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. टाटा समूहाने गुजरात (Gujarat) सरकारसोबत एक सामंजस्य करार (MoU) केला आहे, ज्याअंतर्गत टाटा समूह राज्यात लिथियम आयन सेल (Lithium-Ion Cell) मॅन्युफॅक्चरिंग गिगा कारखाना उभारणार आहे. टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या अग्रतास एनर्जी स्टोअरेज सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने (Agratas Energy Storage Solutions Pvt Ltd) गुजरात सरकारसोबत हा करार केला आहे.


सामंजस्य करारावर स्वाक्षरी


प्रस्तावित गीगा कारखाना हा भारतातील पहिला लिथियम-आयन सेल उत्पादन कारखाना असेल. पहिल्या टप्प्यात 20 GWh च्या उत्पादन क्षमता आणि सुमारे 13,000 कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणुकीसह कंपनी इथे निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. या सामंजस्य करारावर अग्रतास एनर्जी स्टोअरेज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​सीईओ विजय नेहरा आणि गुजरात सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सचिव यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली आणि देवाणघेवाण केली.


रोजगाराच्या संधी उपलब्ध


टाटा समूहाने हा प्रकल्प इथे सुरु केल्याने गुजरात हे लिथियम-आयन सेल उत्पादनात आघाडीचे राज्य म्हणून स्थापित होईल आणि राज्यातील बॅटरी उत्पादनाच्या विकासाला हातभार लावेल. या गीगा कारखान्याच्या स्थापनेने 2030 पर्यंत देशात 50% कार्बन उत्सर्जन मुक्त ऊर्जा आणि 100% इलेक्ट्रिक वाहन वापराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुजरातला एक नवीन दिशा दिली आहे.


दरम्यान हा प्रकल्प इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देईल आणि 13,000 हून अधिक व्यक्तींसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करेल, असं म्हटलं जात आहे.


गुजरातचे मुख्यमंत्री काय म्हणाले?


देशातील लिथियम-आयन बॅटरीची वाढती मागणी पूर्ण करणं हा या निर्मिती प्रकल्पाचा उद्देश आहे. सरकारकडून देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यावर जोर दिला जात असतानाच या प्रकल्पाच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पामुळे राज्यात मोठ्या प्रमाणाात रोजगार उपलब्ध होती, अशी आशा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी व्यक्त केली आहे. सोबतच या प्रकल्पामुळे राज्यात लिथियम-आयन बॅटरीच्या निर्मितीसाठी एक इकोसिस्टम निर्माण करण्यात मदत होईल, असंही त्यांनी म्हटलं.


त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "गुजरातमध्ये देशातील पहिला लिथियम-आयन सेल उत्पादन करणारा गिगा कारखाना सुरु करण्यासाठी राज्य सरकार आणि टाटा समूह यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. राज्याच्या नवीन इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचे फलित असलेल्या या सामंजस्य करारांतर्गत पहिल्या टप्प्यात 13 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 20 GW क्षमतेचा प्लांट उभारला जाईल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील.


इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढवून कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीकोनासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्याने लिथियम-आयन बॅटरीची मागणीही वाढेल. या प्रकल्पामुळे राज्यात लिथियम-आयन सेल मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम स्थापना होण्यास मदत होईल."






हेही वाचा


New Jobs In Phone Manufacturing : केंद्र सरकारच्या पीएलआय योजनांमुळे स्मार्टफोन निर्मितीमधून दीड लाखांवर नोकऱ्यांची अपेक्षा