नवी दिल्ली सोनं हे अतिशय मौल्यवान धातू आहे. जगभरात सोन्याला मागणी आहे. भारतात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. मात्र सोनं उत्पादन करण्यात भारत हा पहिल्या 10 देशांमध्येही नाही. ज्या देशांच्या मध्यवर्ती बँकेकडे जितकं अधिक सोनं आहे, त्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे, असे समजले जाते. भारताला आपल्या देशांतर्गत सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागते. 


कोणत्या देशात सर्वाधिक सोने?


भारत जगभरातून सोने आयात करतो. दरवर्षी शेकडो टन सोन्याची आयात केली जाते. जगातील सर्वाधिक सोने चीनमधून आयात केले जाते. 2022 या वर्षात चीनने जगातील सर्वाधिक 10.6 टक्के सोन्याचे उत्पादन केले. यानंतर, दुसरा सर्वात मोठा देश रशिया आहे, ज्याचा जागतिक सोन्याच्या उत्पादनात हिस्सा 10.3 टक्के होता.


ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर घसरला


2021 या वर्षात ऑस्ट्रेलियाने चीनला मागे टाकून सोन्याच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांक मिळवला होता, परंतु आता ते तिसऱ्या स्थानावर घसरले आहे. जागतिक सोनं उत्पादनात त्यांचा वाटा सध्या 10.3 टक्के आहे. 2021 च्या पहिल्या सहामाहीत ऑस्ट्रेलियाने 157 टन सोन्याचे उत्पादन केले, तर 2019-20 या आर्थिक वर्षात 328 टन सोने काढले.


2022 मध्ये सोन्याचे उत्पादन करणाऱ्या टॉप टेन देश


> चीन - 10.6 टक्के
> रशिया - 10.3 टक्के
> ऑस्ट्रेलिया - 10.3 टक्के
> कॅनडा - 7.1 टक्के
> अमेरिका - 5.5 टक्के
> मेक्सिको- 3.9 टक्के
> कझाकस्तान - 3.9 टक्के
> दक्षिण आफ्रिका - 3.5 टक्के
> पेरू - 3.2 टक्के
> उझबेकिस्तान - 3.2 टक्के
> घाना - 2.9 टक्के
> इंडोनेशिया - 2.3 टक्के
> जगातील इतर देश - 33.3 टक्के


भारतात सोन्याचे उत्पादन किती?


वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनुसार, जगात सोन्याची खाण सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे दोन लाख टन सोने काढण्यात आले आहे. भारतात सोन्याचे सर्वाधिक उत्पादन कर्नाटक राज्यात होते. येथे कोलार, एहुटी आणि उटी येथून मोठ्या प्रमाणात सोने काढले जाते. भारतात सुमारे 1.6 टन सोन्याचे उत्पादन होते आणि दरवर्षी 774 टन सोने विक्री होते. तर जगात 3 हजार टन सोने काढले जाते. 


सरकारही देते सोन्यातील गुंतवणुकीची संधी


सोन्यात गुंतवणूक करण्याकडे भारतीयांचा नेहमीच कल असल्याचं पाहायला मिळतो. परंतु, बदलत्या काळासोबतच सोन्यात गुंतवणूक करण्याची पद्धतही बदलल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारकडून वेळोवळी सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम जाहीर केली जाते.


सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम (Sovereign Gold Bond Scheme) या योजनेतंर्गत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला बाजार भावाच्या तुलनेत स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी मिळते.


सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये, गुंतवणूकदार 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यात गुंतवणूक करतात म्हणजेच 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता येते.