Tirupati Laddu News: आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर (Tirupati temple) सध्या एका वेगळ्या वादाचे केंद्र बनले आहे. तिरुपती मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये (Laddu) प्राण्यांची चरबी असलेले तूप आणि माशाचे तेल मिसळल्याचा आरोप केला जातोय. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर हे आरोप केले आहेत. दरम्यान, देशातील या सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये दरवर्षी लाडूच्या प्रसाद विक्रीतून किती रुपयांचे उत्पन्न मिळते? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? तर लाडू विक्रीतून मंदीर दरवर्षी 500 कोटी रुपये कमवते.


दररोज लाडूसाठी 500 किलो तुपाचा वापर  


तिरुपती मंदिरात दररोज सुमारे 3 लाख लाडू बनवण्यासाठी सुमारे एक टन बेसन, 10 टन साखर, 700 किलो काजू, 500 किलो साखर कँडी आणि सुमारे 500 किलो तूप वापरले जाते. प्रत्येक लाडूचे वजन 175 ग्रॅम असावे. त्यांना फूड टेस्टिंग लॅबमधूनही जावे लागते. त्याचा इतिहास सुमारे 300 वर्षांचा आहे. 1984 पर्यंत स्वयंपाकघरात (पोटू) प्रसाद बनवण्यासाठी लाकडाचा वापर केला जात होता. आता ते गॅस स्टोव्हवर बनवले जाते. लाडूंना 2009 मध्ये GI टॅग देखील मिळाला आहे. ते बनवण्याच्या प्रक्रियेला दित्तम म्हणतात.


मंदिरात तीन प्रकारचे लाडू बनतात


मंदिरात तीन प्रकारचे लाडू अर्पण केले जातात. अस्थानम लाडू खास सणांच्या वेळीच तयार केले जातात. अरिजीत सेवेत सहभागी होणाऱ्या भाविकांना कल्याणोत्सवाचे लाडू दिले जातात. प्रोक्तम लाडू सर्व पाहुण्यांसाठी उपलब्ध आहेत.


तिरुपती मंदिराला अमूल इंडियाचे तूप नाही


दरम्यान, अमूल इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, तिरुपती मंदिराला आमच्याकडून तूप कधीच पुरवले गेले नाही. सोशल मीडियावर अशा प्रकारचे वृत्त समोर आले आहे. ज्यात असे म्हटले आहे की आमच्या वतीने तिरुपती मंदिराला तूप (अमूल तूप) पुरवठा करण्यात आला होता. हे सर्व वृत्त अफवा असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आमचे तूप अनेक चाचण्यांनंतर बनवले जाते. यामध्ये भेसळीला वाव नाही. अमूल तूप तयार करण्यासाठी आमच्याकडे ISO प्रमाणित उत्पादन प्रकल्प आहे. तूप बनवण्यासाठी वापरले जाणारे दूधही आमच्या कलेक्शन सेंटरमध्ये येते. दुधाची गुणवत्ताही येथे तपासली जाते. आम्ही FSSAI च्या सर्व मानकांचे पालन करून आमची सर्व उत्पादने तयार करतो. दरम्यान, तामिळनाडूच्या एआर डेअरी फूड्सकडून केवळ 320 रुपये किलो दराने गाईचे तूप विकत घेतले जात होते. आता मंदिरातील तूप पुरवठ्याचे कंत्राट कर्नाटक दूध महासंघाला देण्यात आले आहे. त्यांच्याकडून 475 रुपये किलो दराने तूप पुरवले जाते.


महत्वाच्या बातम्या:


Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!