जर तुमची पत्नी गृहिणी आहे आणि ती भविष्यात आर्थिकदृष्ट्या अधिक आत्मनिर्भर व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर, केंद्र सरकारची एक योजना तुम्हाला मदत करू शकते. या योजनेतंर्गत तुमच्या पत्नीला दरमहा जवळपास 44,793 रुपये मिळू शकतात. 


या योजनेचे नाव आहे NPS. ही योजना एकप्रकारची पेन्शन योजना आहे. तुम्हाला या योजनेतंर्गत 60 वर्षानंतर दरमहा एक ठाराविक रक्कम मिळणार आहे. 


गुंतवणूक करणे सोपं


या योजनेत दरमहा अथवा वार्षिकपणे पैसे जमा करता येऊ शकतात. या योजनेत तुम्ही दरमहा एक हजार रुपयानेदेखील आपल्या पत्नीच्या नावे NPS खातं सुरू करू शकता. या योजनेतील खातं 60 व्या वर्षी मॅच्युअर होते. नवीन नियमांनुसार, तुम्ही पत्नीच्या 65 व्या वर्षापर्यंतदेखील NPS खातं सुरू ठेवू शकता. 


अशी मिळेल 45 हजारापर्यंत पेन्शन


जर तुमच्या पत्नीचे वय 30 वर्ष आहे आणि तुम्ही तिच्या NPS खात्यात दरमहा 5000 रुपये जमा करत असाल तर त्या गुंतवणुकीवर वार्षिक 10 टक्के परतावा मिळत राहिल्यास त्यांच्या 60 व्या वर्षी त्यांच्या खात्यात 1.12 कोटी रुपये जमा होतील. पत्नीला त्यातील जवळपास 45 लाख रुपये मिळतील. त्याशिवाय दरमहा 45 हजार रुपयांच्या आसपास त्यांना पेन्शन मिळेल. विशेष म्हणजे ही पेन्शन त्यांना आजीवन मिळत राहणार. 


किती मिळतो परतावा 


या योजनेतील गुंतवणुकीवर किती टक्के परतावा मिळेल, हे निश्चित नाही. मात्र, आतापर्यंत या योजनेत मिळालेला परतावा पाहिल्यास गुंतवणुकदारांना जवळपास 10 ते 11 टक्के परतावा मिळू शकतो. 


या योजनेत गुंतवणूक कोण करू शकतो?


या योजनेत वय 18 ते 65 वर्ष या वयोगटातील कोणताही भारतीय नागरीक यामध्ये खातं सुरू करू शकतो. एक व्यक्ती एकच NPS खात सुरू करू शकतो. यामध्ये संयुक्त खाते असू शकत नाही. 


दोन प्रकारची खाती


या योजनेत दोन प्रकारचे खाती आहेत. टीयर-1 आणि टीयर-2 असे दोन खाती प्रकार आहेत. 


टीयर-1 मधील खात्यात पैसे गुंतवल्यास मुदतीपूर्वी तुम्हाला काढता येऊ शकत नाही. मुदत संपल्यानंतर तुम्ही हे पैसे काढू शकता. 


टीयर-2 अकाउंट सुरू करण्यासाठी तुमचे टीयर-1 मध्ये खातं हवं. यामध्ये तुम्ही इच्छेनुसार पैसे जमा करू शकता अथवा रक्कम काढू शकता.