Petrol-Diesel Price Update: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असली तरी देशांतर्गत बाजारात इंधनाचे दर जैसे थेच आहेत. असं असलं तरी Jio-BP आणि Naira Energy या खाजगी क्षेत्रातील रिटेलिंग कंपनीला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. या खासगी क्षेत्रातील कंपन्यांना डिझेलच्या विक्रीवर प्रतिलिटर 20 ते 25 रुपये आणि पेट्रोलवर 14 ते 18 रुपयांचा तोटा होत आहे. या कंपन्यांनी पेट्रोलियम मंत्रालयाला पत्र लिहून ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली आहे.
सरकारी कंपनीचा समावेश
फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री (FIPI) ने 10 जून रोजी पेट्रोलियम मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतील तोटा किरकोळ व्यवसायातील गुंतवणूक मर्यादित करेल. FIPI खाजगी क्षेत्रातील कंपन्यांव्यतिरिक्त इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) यांची सदस्य म्हणून गणना करते.
पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर
कच्च्या तेलाच्या आणि त्याच्या उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय किमती दशकभराच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. परंतु सरकारी इंधन विक्रेत्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जैसे थेच ठेवल्या आहेत. इंधनाच्या किरकोळ व्यवसायात सरकारी कंपन्यांचा वाटा 90 टक्के आहे. सध्या इंधनाचे दर हे खर्चाच्या दोन तृतीयांश इतकेच आहेत, त्यामुळे खासगी कंपन्यांचे नुकसान होत आहे. यामुळे Jio-BP, Rosneft-समर्थित नायरा एनर्जी आणि शेल यांना किमती वाढवण्याचा किंवा त्यांचे ग्राहक गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कंपन्यांचा वाढत आहे तोटा
6 एप्रिलपासून किरकोळ इंधनाच्या दरात वाढ झालेली नाही. तसेच राज्य परिवहन उपक्रमांसारख्या मोठ्या प्रमाणात खरेदीदारांना विकल्या जाणार्या इंधनाच्या किंमती आंतरराष्ट्रीय किमतींनुसार वाढल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात घाऊक खरेदीदार रिटेल आऊटलेट्समधून खरेदी करत आहेत, त्यामुळे खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे नुकसान वाढत असल्याचे FIPI ने म्हटले आहे.