Property Prices : देशातील अनेक शहरांमध्ये मालमत्तेच्या किंमतीत (Property Prices) मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं लोकांना घरे खरेदी करणं कठीण झालं आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, जून तिमाहीत देशातील तीन शहरांमध्ये मुख्य निवासी मालमत्तांच्या किमती 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.


दरवाढीच्या बाबतीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर


रिअल इस्टेट कन्सल्टंट फर्म नाइट फ्रँकच्या अहवालानुसार, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून 2024 मध्ये मालमत्तेच्या किमती खूप वेगाने वाढल्या आहेत. या तीन महिन्यांत मुंबई, नवी दिल्ली आणि बंगळुरु या तीन शहरांमध्ये मालमत्तेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मुंबईत एवढी वाढ झाली आहे की जगभरातील प्रमुख शहरांमध्ये दरवाढीच्या वेगाच्या बाबतीत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.


मुंबईत घरांच्या किंमतीत 13 टक्क्यांची वाढ  


मुंबईत घरांच्या किंमतीत 13 टक्क्यांची वाढ झाली आहे. नाइट फ्रँकच्या 'प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स क्वार्टर-2 2024' अहवालानुसार, जून तिमाहीत मुंबईतील मालमत्तेच्या किमती वार्षिक आधारावर 13 टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत जून तिमाहीत मुंबईतील मालमत्तेच्या किमती 13 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जगातील सर्व प्रमुख शहरांमध्ये ही दुसरी सर्वात वेगवान वाढ आहे.


नवी दिल्लीसह बंगळुरुमध्ये घरांच्या किंमतीत मोठी वाढ


राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतही निवासी मालमत्तांच्या किमती 10 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. अहवालानुसार, नवी दिल्लीतील निवासी मालमत्तेच्या किंमती एक वर्षापूर्वीच्या तुलनेत जून तिमाहीत 10.6 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचवेळी, बंगळुरुमध्ये अशा मालमत्तेची किंमत वार्षिक आधारावर 3.7 टक्क्यांनी वाढली आहे. किमतींमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे, तर नवी दिल्ली जगात तिसऱ्या स्थानावर आहे, तर बंगळुरु 15 व्या स्थानावर आहे.


 भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात वेगाने वाढ होण्याचं कारण काय?


भारत जगातील सर्वात प्रमुख रिअल इस्टेट बाजारपेठांपैकी एक आहे. नाइट फ्रँकचा अहवाल सांगतो की, भारतातील लोकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसा मिळत आहे आणि ते झपाट्याने श्रीमंत होत आहेत. त्यासोबतच भारतीयांच्या आकांक्षाही वाढत आहेत. या कारणास्तव, भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात वेगाने वाढ होताना दिसत आहे. येणाऱ्या काळातही मालमत्तेच्या किंमतीत वाढ कायम राहणार आहे. दरम्यान, मालमत्तेच्या वाढत्या दरांमुळं सर्वसामान्य नागरिकांना शहराच्या ठिकाणी घर घेणं परवडत नाही.


महत्वाच्या बातम्या:


प्रॉपर्टी विकण्याचा विचार करताय? मोठा झटका बसू शकतो; अर्थसंकल्पात टॅक्स कमी झाला, पण 'हा' महत्त्वाचा नियम बदलला!