पॅरिस : अब्जाधीश म्हणून ओळख असलेले  टेलिग्रामचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पावेल ड्युरोव (Pavel Durov) यांना 25 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये अटक करण्यात आलं. पॅरिसमधील बौरगेट विमानतळावर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. ड्युरोव हे आपल्या खासगी विमानाने प्रवास करत होते. चौकशीसाठी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. 

 

टेलिग्रामशी संबंधित आरोपांवर होणार चौकशी




टेलिग्राम कंपनीत मॉडरेटर्स नसल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांबाबत चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. मॉडरेटर्स नसल्यामुळे टेलिग्राम या मेसेजिंग अॅपवर गुन्हेगारीविषयक कृत्य उघडपणे चालत होते, असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, पावेल यांच्या अटकेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 


रशियाची भूमिका काय? 


पावेल यांच्यावरील या कारवाईनंतर टेलिग्रामतर्फे आणखी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. दुसरीकडे फ्रान्स सरकार तसेच तेथील पोलिसांनाही यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. रशियाने मात्र या कारवाईवर भूमिका घेतली आहे. नेमकं काय घडतंय, सध्याची स्थिती काय आहे, जे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे रशियाने म्हटले आहे. 


पावेल ड्युरोव कोण आहेत? 


पावेल हे 39 वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म रशियामध्ये झाला. ते टेलिग्राम या मेसेजिंग अॅपचे संस्थापक आहेत. टेलिग्राम हा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. रशिया आणि फ्रान्समधील माध्यमांनुसार ड्युरोव यांनी 2021 मध्ये फ्रान्सचे नागरिकत्व स्वीकारले होते. 2017 सालापासून टेलिग्राम हे माध्यम दुबईतून चालवले जात होते. फोर्ब्सनुसार पावेल यांची एकूण संपत्ती  15.5 अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. त्यांनी 2014 साली रशिया हा देश सोडला होता.


टेलिग्राम म्हणजे व्हर्च्यूअल बॅटलफिल्ड 


टेलिग्राम हे समाजमाध्यम भारतातही लोकप्रिय आहे. अनेक लोक हे माध्यम मेसेजिंगसाठी वापरतात. व्हॉट्सअॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम अशी माध्यमं टेलिग्रामचे मुख्य स्पर्धक आहेत. सध्या चालू असलेल्या रशिया आणि युक्रेनच्या युद्ध क्षेत्रात टेलिग्रामचा वापर फार वाढलेला आहे. रशिया, युक्रेन या भागात टेलिग्राम वापरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. याद्धक्षेत्रात टेलिग्रामला व्हर्च्यूअल बॅटलफिल्ड म्हटले जाते.  


हेही वाचा :


मोठी बातमी! रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 5254 जागांसाठी भरती, पात्रता काय? कसा कराल अर्ज?


Unified Pension Scheme : यूनिफाइड पेन्शन योजना नेमकी काय? केंद्र सरकारनं मंजुरी दिलेल्या योजनेच्या तरतुदी कोणत्या? एनपीएस सुरु राहणार? 


UPS आणि NPS म्हणजे नेमकं काय? दोन्हीमध्ये नेमका फरक काय? सविस्तर माहिती एका क्लिकवर