Diwali 2024: पुढच्या काही दिवसातच दिवाळीचा (Diwali) सण येणार आहे. या दिवाळीच्या सणाला अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना (Employees) विविध प्रकारच्या भेटवस्तू देतात. कोणी पगार सोडून बोनस देतं, तर कोणी मिठाई, काही वस्तू देतं. मात्र, एका कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला सलाम करत दिवाळीसाठी भेट (Diwali Gifts) म्हणून कार आणि बाईकचं वाटप केलं आहे. 


आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी चेन्नईच्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकी आणि ह्युंदाईपासून मर्सिडीज बेंझपर्यंत गाड्या दिल्या आहेत. याआधीही कंपनी अशा भेटवस्तू देत आली आहे. कंपनी आणि कर्मचारी ही एकाच वाहनाची दोन चाके आहेत. यापैकी एकही नीट चालले नाही तर व्यवसायाचा प्रवास आणि यश खूप कठीण होऊन बसते. गेल्या एक वर्षापासून आपण जगभरातून टाळेबंदी, खर्चात कपात आणि वेतनवाढ आणि बोनसवर बंदी असे शब्द ऐकत आहोत. अशा वातावरणातही काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण बक्षीस देत आहेत. असाच निर्णय चेन्नईच्या एका कंपनीने घेतला आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार आणि बाईक दिल्या आहेत. याशिवाय लग्नासाठी दिल्या जाणाऱ्या मदतीतही वाढ करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.


 28 कार आणि 29 बाईक कर्मचाऱ्यांना भेट 


टीम डिटेलिंग सोल्युशन्स असं चेन्नईतील या कंपनीचं नाव आहे. या कंपनीने 28 कार आणि 29 बाईक कर्मचाऱ्यांना भेट दिल्या आहेत. टीम डिटेलिंग सोल्युशन्स, 2005 मध्ये चेन्नईत सुरु झाली होती. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना 28 कार आणि 29 बाइक भेट दिल्या आहेत. यामुळं कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावेल आणि ते यापासून प्रेरणा घेऊन अधिक मेहनत करुन उत्पादकता वाढवण्यावर भर देतील असे कंपनीचे म्हणणे आहे. टीम डिटेलिंग सोल्युशन्स स्ट्रक्चरल स्टील डिझाइन आणि तपशील सेवा प्रदान करते. कंपनीच्या वेबसाइटनुसार, ते SDS/2, Tekla, AutoCAD, MathCAD, Descon आणि Office Document Software वापरते.


कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचा आदर 


कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच, त्यांच्या मेहनतीचा आदर केला पाहिजे असे मत कंपनीचे एमडी श्रीधर कन्नन यांनी व्यक्त केले. कंपनीने प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कामगिरीच्या आणि वर्षांच्या मेहनतीच्या आधारे भेटवस्तू देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी वचनबद्धतेने आणि समर्पणाने कंपनीच्या वाढीसाठी योगदान दिले आहे. त्यांचा आम्हाला अभिमान आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई व्यतिरिक्त, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मर्सिडीज बेंझ सारख्या लक्झरी कार देखील दिल्या आहेत.


लग्नासाठी कंपनीकडून मिळणार 1 लाख रुपये 


यापूर्वीही आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना बाईक भेट देत आलो आहोत. 2022 साली आम्ही आमच्या दोन वरिष्ठ सहकाऱ्यांना एक कार भेट दिली होती. आज आम्ही 28 कार गिफ्ट केल्या आहेत. याशिवाय 29 बाईकही देण्यात आल्या आहेत. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांना मदत करत आहोत. एखाद्याला मिळत असलेल्या कारपेक्षा महागडी कार हवी असेल तर तो जास्तीचे पैसे देऊन ती खरेदी करू शकतो असे कन्नन म्हणाले. आतापर्यंत आम्ही लग्नासाठी लोकांना 50 हजार रुपयांची मदत करायचो. आता यातही वाढ करुन एक लाख रुपये करण्यात आले आहेत. आम्हाला आमच्या कंपनीत उत्तम कार्यसंस्कृती निर्माण करायची असल्याचे कन्नन म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!