Direct Tax Collection:  2022-23 या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सरकारने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा ही अधिक कर संकलन करण्यात आले. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष  2022-23 मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 16.61 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. मागील वर्ष 2021-22 मध्ये 14.12 लाख कोटी रुपये इतके झाले होते. 2022-23 मध्ये प्रत्यक्ष कर संकलन मागील वर्षाच्या तुलनेत 17.63 टक्के अधिक झाले असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. 


प्रत्यक्ष कर संकलनाबाबत अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2022-23 मध्ये तात्पुरत्या आकडेवारीनुसार, प्रत्यक्ष कर संकलन 16.61 लाख कोटी रुपये इतके झाले. अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा 16.97 टक्क्यांनी अधिक म्हणजेच 2.41 लाख कोटी रुपये जास्त आहे. अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये 14.20 लाख कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष कर संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सुधारित अंदाजानुसार हे उद्दिष्ट 16.50 लाख कोटी रुपये करण्यात आले. परंतु प्रत्यक्ष कर संकलनाचे आकडे बजेट अंदाजापेक्षा 16.97 टक्के अधिक आणि सुधारित अंदाजापेक्षा 0.69 टक्के अधिक आहेत. 






जारी केलेला परतावा जोडून, ​​2022-23 मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलन 19.68 लाख कोटी रुपये झाले आहे. 2021-22 मधील 16.36 लाख कोटी रुपयांपेक्षा 20.33 टक्के जास्त आहे. कॉर्पोरेट कर संकलन 2022-23 मध्ये 16.91 टक्क्यांनी वाढून 10,04,118 कोटी रुपये झाले आहे. हा कॉर्पोरेट कर 2021-22 मध्ये 8.58,849 कोटी रुपये इतका होता.


2022-23 मध्ये STT म्हणजेच सुरक्षा व्यवहार कर जोडल्यानंतर वैयक्तिक आयकर संकलन 9,60,764 कोटी रुपये इतके झाले आहे. वर्ष 2021-22 च्या तुलनेत 24.23 टक्के अधिक कर संकलन झाले आहे. वर्ष 2021-22 मध्ये वैयक्तिक आयकर संकलन 7,73,389 कोटी रुपये होते. 2022-23 मध्ये, प्राप्तिकर विभागाने 3,07,352 कोटी रुपयांचा परतावा जारी केला. वर्ष 2021-22 मधील 2,23,658 कोटी रुपयांच्या तुलनेत 37.42 कोटी रुपयांहून अधिक आहे.


मार्च महिन्यात 1.60 लाख कोटीहून अधिक जीएसटी संकलन


देशात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कलेक्शनने (GST Collection) सरकारच्या तिजोरीत चांगलीच भर पडली आहे. मार्च 2023 मध्ये जीएसटी संकलन (March 2023 GST Collection) चांगले झाले आहे. मार्च 2023 मध्ये देशाचे जीएसटी संकलन 1 लाख 60 हजार 122 कोटी रुपये इतके झाले. जीएसटीच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हे दुसरे सर्वात मोठे संकलन आहे. जीएसटी कर संकलनाच्या दृष्टीने गेल्या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना चांगला गेला आहे.


एप्रिल 2022 नंतरचे दुसरे सर्वोच्च जीएसटी संकलन  आहे. मार्च 2023 च्या जीएसटी संकलनातील विशेष बाब म्हणजे सलग 14 महिने जीएसटी संकलन हे 1.4 लाख कोटी रुपयांच्यावर राहिले आहे. दुसरीकडे, देशात जीएसटी लागू झाल्यापासून, जीएसटी संकलन 1.6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेच यंदाच्या वर्षी जीएसटी महसुलात 13 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.