मुंबई: आज टाटा स्टीलच्या (Tata Steel) सप्टेंबरच्या तिमाहीचा अहवाल (Tata Steel Q2 profit) जारी करण्यात आला. त्यामध्ये टाटा स्टीलच्या यंदाच्या नफ्यात तब्बल 90 टक्क्यांची घसरण झाल्याचं स्पष्ट झालं. टाटा स्टीलच्या निव्वळ नफ्यात 12,547 कोटी रुपयावरुन 1,297 कोटींपर्यंत घसरण झाली आहे. खर्च वाढल्याने कंपनीच्या नफ्यात घट झाल्याचं टाटा स्टीलच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. टाटा स्टील ही देशातील अग्रगण्य कंपनी आहे. त्यामुळे ही मंदीची चाहूल आहे का अशी चर्चाही सुरू आहे. 


गेल्या वर्षीचा विचार करता सप्टेंबरच्या तिमाहीत (Tata Steel Q2 profit)  टाटा स्टीलचा निव्वळ नफा हा 12,547 कोटी रुपये इतका होता. आता त्यामध्ये लक्षणीय अशी घट झाली आहे. गेल्या वर्षी टाटा स्टीलचा जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील महसूल हा 60,657 कोटी रुपये इतका होता. त्यानंतर आता यामध्ये घट झाली. यंदाच्या तिमाहीत कंपनीचा महसूल हा 60,206 कोटी रुपये इतका आहे. 


 






खर्चामध्ये मोठी वाढ 


टाटा स्टीलने जारी केलेल्या निवेदनात सांगितलं आहे की, यंदाच्या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च हा 57,684 कोटी इतका आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत हा खर्च 47,239 कोटी रुपये इतका होता. टाटा स्टील ही कंपनी भारतातील एक अग्रगण्य कंपनी आहे. टाटा स्टील बोर्डने सात लिस्टेड आणि अनलिस्टेड कंपन्यांच्या एकीकरणाचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. 


मंदीची चाहूल? 


कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये मंदीसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था या रसातळाला गेल्याचं दिसून आलं होतं. त्यातून अनेक देश आतासं काही सावरत असताना पुढच्या वर्षी म्हणजे 2023 साली जगभरात पुन्हा एकदा मंदी येण्याची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जागतिक बँकेने आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही तशा प्रकारचे संकेत दिले होते. आता टाटा स्टील सारख्या मोठ्या कंपनीच्या नफ्यातील घसरणीने भारतातही त्याची चाहूल लागली आहे का असा प्रश्न पडतोय.