Digital Payment Platform: अ‍ॅमेझॉन पे (Amazon Pay) फोन पे (PhonePe) गुगल पे (Google Pay) आणि पेटीएम (Paytm) या डिजिटल पेमेंट जगतात आता लवकरच स्पर्धा तीव्र होणार आहे. कारण मीठापासून ते स्टील उत्पादकापर्यंतचा आवाका असलेला अवाढव्य असा टाटा समूह आता डिजिटल पेमेंटच्या जगात पाऊल ठेवतो आहे. टाटा लवकरच युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच युपीआय (UPI) पेमेंट अ‍ॅप लॉन्च करू शकते. कंपनीला यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून मंजुरी मिळणार आहे. मंजुरी मिळताच कंपनी आपली युपीआय सेवा सुरू करू शकते.


एका अहवालानुसार, टाटा समूह देशात स्वतःची युनायटेड पेमेंट्स इंटरफेस आधारित डिजिटल पेमेंट सेवा ऑफर करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळवत आहे. टाटा समूहाने थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशन प्रोव्हायडर म्हणून काम करण्यासाठी एनपीसीआयकडे अर्ज केला आहे. ही सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा टाटा समूहाचा विचार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


आयसीआयसीआय बँकेशी (ICICI BANK) संवाद


टाटा ग्रुप (Tata Group) , त्यांच्या डिजिटल व्यावसायिक युनिट टाटा डिजिटलद्वारे, त्याच्या युपीआय पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेशी चर्चा करतो आहे. युपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म, जर एनसीपीआयने मंजूर केला तर, टाटा समूहाला त्यांच्या ग्राहकांसाठी ई-कॉमर्स अनुभव वाढविण्यात मदत होईल.


टाटा समूहाने या डिजिटल पेमेंट अ‍ॅपला 'टाटा न्यू' असे नाव दिले आहे आणि अशी अपेक्षा आहे की समूह पुढील महिन्यात आयपीएल सत्र (IPL 2022) दरम्यान त्याचे अॅप लॉन्च करू शकेल. हे अ‍ॅप वापरकर्त्यांना सर्व टाटा डिजिटल अॅप्स जसे की Bigbasket, 1MG, Croma, Tata Cliq आणि Tata Group च्या फ्लाइट बुकिंग सेवा एकाच अॅपमध्ये सहज प्रवेश देईल. तज्ञांच्या मते, टाटा डिजिटलची घोषणा 7 एप्रिल रोजी केली जाऊ शकते.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


UPI Payment : UPI पेमेंट्सचा वापर करताय, मग 'या' गोष्टीकडे द्या लक्ष