Cars Sales Report: टाटा मोटर्सने जून 2022 मध्ये 79,606 वाहनांची विक्री केली आहे. जून 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 43,704 युनिटच्या तुलनेत 82 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण व्यावसायिक वाहनांची विक्री (देशांतर्गत + निर्यात) जून 2021 मध्ये 22,100 युनिट्सवरून जून 2022 मध्ये 69 टक्क्यांनी वाढून 37,265 युनिट्स झाली. जून 2022 मध्ये व्यावसायिक वाहनांची देशांतर्गत विक्री 34,409 युनिट्स झाली, जी जून 2021 मध्ये 19,594 युनिट्सच्या तुलनेत 76 टक्क्यांनी वाढली. याच कालावधीत कंपनीची व्यावसायिक वाहन निर्यात 2,506 युनिट्सवरून 14% वाढून एकूण 2,856 युनिट्सवर पोहोचली आहे.


प्रवासी वाहनांची विक्रीही वाढली


कंपनीची एकूण देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री जून 2021 मध्ये झालेल्या 24,110 युनिटच्या तुलनेत जून 2022 मध्ये 87 टक्क्यांनी वाढून 45,197 युनिट्स झाली. जून 2021 च्या तुलनेत जून 2022 मध्ये पेट्रोल आणि डिझेल कारची विक्री 78 टक्क्यांनी वाढून 41,690 युनिट्स झाली. तर इलेक्ट्रिक कारची विक्री 433 टक्क्यांनी वाढून 3,507 युनिट्स झाली आहे.


FY2023 च्या पहिल्या तिमाहीत 9,283 विक्रीसह इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने नवीन उच्चांक गाठला आणि जून 2022 मध्ये 3,507 युनिट्सची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री नोंदवली. मे 2022 मध्ये लॉन्च झालेल्या Nexon EV Max ला प्रचंड मागणी आहे. कंपनीने आर्थिक वर्ष 2022 च्या चौथ्या तिमाहीत 1,032.84 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला होता. जो आर्थिक वर्ष 2021 च्या याच कालावधीत 7,605.40 कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत निव्वळ विक्री वार्षिक 11.3 टक्क्यांनी घटून 77,857.16 कोटी रुपयांवर आली आहे.


आज पासून टाटा मोटर्सचे वाहने महागली 
  
टाटा मोटर्सने आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने व्यावसायिक वाहनांच्या किमती 1.5-2.5 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. टाटा मोटर्सने सांगितले की, कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे उत्पादन महाग झाले आहे, त्यामुळे किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


टाटा मोटर्स भारतात सेमीकंडक्टर बनवणार 


आगामी काळात टाटा मोटर्स देशातील सेमीकंडक्टर चिप्सच्या निर्मितीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अलीकडे कंपनीने सेमीकंडक्टरच्या डिझाइन, विकास आणि उत्पादनासाठी जपानच्या सेमीकंडक्टर कंपनी, रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनशी भागीदारी केली आहे. टाटा समूहाची उपकंपनी असलेल्या तेजस नेटवर्क्स लिमिटेड आणि रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स यांच्यात ही भागीदारी आहे.