Vat Purnima 2023 : आज वटपौर्णिमेचा दिवस. हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजेच वटपौर्णिमा (Vat Purnima 2023). ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचा व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
वट पौर्णिमा व्रत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पाळला जातो. भारताच्या उत्तर भागात वटपौर्णिमेचं हे व्रत अमावस्या तिथीला पाळले जाते आणि महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिण भागात हे व्रत पौर्णिमा तिथीला पाळले जाते.
वट सावित्री पौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची आणि भगवान विष्णूची पूजा करतात. असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात. यावर्षीच्या वट पौर्णिमा व्रताची तारीख, शुभ मुहूर्त आणि शुभ योग नेमका काय आहे ते जाणून घेऊयात.
वट सावित्री पौर्णिमा व्रत 2023 तारीख (Vat Purnima Date 2023)
हिंदू धर्म मान्यतेनुसार, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा 03 जून रोजी सकाळी 11:16 वाजता सुरू होईल आणि 04 जून रोजी सकाळी 09:11 वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत वट पौर्णिमेचं व्रत शनिवार, 03 जून 2023 रोजी म्हणजेच आज पाळण्यात येणार आहे.
वट सावित्री पौर्णिमा व्रत 2023 शुभ योग
हिंदू पंचांगात सांगितले आहे की, वट पौर्णिमा व्रताच्या दिवशी तीन अतिशय शुभ संयोग निर्माण होत आहेत. या दिवशी अनुराधा नक्षत्र तयार होईल जे सकाळी 06.16 ते पूर्ण रात्रीपर्यंत असते. तसेच, या दिवशी शिव आणि सिद्ध योग तयार होत आहेत. शिवयोग दुपारी 02.48 पर्यंत चालेल आणि त्यानंतर सिद्धयोग सुरू होईल.
वट सावित्री पौर्णिमा व्रताचे महत्त्व
वट पौर्णिमा आणि अमावस्या व्रत यात विशेष फरक नाही. या शुभ दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि झाडाला धागा बांधून त्या भोवती फेरे घेतात. असे मानले जाते की, वटवृक्षात भगवान विष्णू वास करतात आणि त्यांची पूजा केल्याने जीवनातील अनेक समस्या दूर होतात. इतकंच नव्हे तर, संतानप्राप्तीसाठीही अनेक महिला वटवृक्षाची पूजा करतात.
महत्त्वाच्या बातम्या :