मुंबई : देशातील आघाडीच्या व्यावसायिक समूहांमध्ये गणल्या जाणाऱ्या टाटा समूहाच्या (Tata Group) नावावर आणखी एक कामगिरी नोंदवण्यात आली आहे. टाटा ग्रुपने शेजारील देश असलेल्या पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला (Pakistan Economy Crisis) मागे टाकलं आहे. टाटा समूहाचे बाजार भांडवल 365 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. आयएमएफच्या अंदाजानुसार, आर्थिक आणि राजकीय संकटात अडकलेल्या पाकिस्तानचा जीडीपी (Pakistan GDP) केवळ 341 अब्ज डॉलर इतकाच आहे.


TCS चे बाजारमूल्य पाकिस्तानच्या GDP च्या अर्धे


गेल्या वर्षी टाटा समूहातील कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने वाढले आहेत. त्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावाही दिला आहे. त्यामुळे टाटा समूहाच्या मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाली आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मूल्य 170 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झालं आहे. हे पाकिस्तानच्या जीडीपीच्या निम्मे आहे.


टाटा समूहाच्या 8 कंपन्यांची संपत्ती दुप्पट 


टाटा समूहाच्या टाटा मोटर्स (Tata Motors), ट्रेंट (Trent), टायटन (Titan), टीसीएस (TCS) आणि टाटा पॉवर  (Tata Power) यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. गेल्या वर्षभरात समूहाच्या 8 कंपन्यांची संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे. यामध्ये बनारस हॉटेल्स (Benaras Hotels), टीआरएफ (TRF), ऑटोमोबाइल कॉर्पोरेशन ऑफ गोवा (Automobile Corporation of Goa), आर्टसन इंजिनिअरिंग (Artson Engineering) आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (Tata Investment Corporation) यांचाही समावेश आहे. सुमारे 2.7 लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेले टाटा कॅपिटल पुढील वर्षी आपला आयपीओ लॉन्च करू शकते.


पाकिस्तानची अर्थव्यवस्था कर्जाच्या खाईत


इस्लामाबाद थिंक टँक TabAdLab ने एका अहवालात दावा केला आहे की, पाकिस्तानचे कर्ज त्याच्या GDP पेक्षा वेगाने वाढत आहे. त्यामुळे उत्पादन वाढवण्याच्या अर्थव्यवस्थेच्या क्षमतेला बाधा येत आहे. पाकिस्तानला मोठ्या बदलांची नितांत गरज आहे. तसे झाले नाही तर पाकिस्तान आणखीनच कर्जाच्या खाईत लोटत राहील आणि कर्जबुडव्या देशाकडे वाटचाल करेल. 2011 पासून पाकिस्तानचे विदेशी कर्ज जवळपास दुप्पट झाले असून देशांतर्गत कर्ज सहा पटीने वाढले आहे. 2024 या आर्थिक वर्षात पाकिस्तानला अंदाजे 49.5 अब्ज डॉलरचे कर्ज फेडावे लागणार आहे.


पाकिस्तानमध्ये नुकतीच निवडणूक पार पडली असून त्या ठिकाणी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहता जे कोणते सरकार सत्तेत येईल त्याच्यासमोर पाकिस्तानला कर्जातून बाहेर बाहेर काढण्याचं आव्हान असेल.


ही बातमी वाचा: