मुंबई : भारतीय शेअर बाजारात 2024 मध्ये अनेक कंपन्यांचे आयपीओ आणि एसएमई आयपीओ लिस्ट झाल्याचं पाहायला मिळालं. गुंतवणूकदारांना काही आयपीओ वगळता इतर आयपीओच्या माध्यमातून चांगला परतावा मिळाला. प्रीमियम एनर्जीज, वारी एनर्जीज, पीएनजी ज्वेलर्स, एनटीपीसी ग्रीन एनर्जी, एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स या कंपन्यांच्या आयपीओनं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. आयपीओचा ट्रेंड 2025 मध्ये देखील कायम राहण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये सर्वात मोठा आयपीओ ह्युंदाई मोटर्स इंडिया या कंपनीचा आला होता.ह्युंदाईचा आयपीओ 25 हजार कोटी रुपयांची उभारणी करण्यासाठी आला होता. 2025 मध्ये टाटा ग्रुपच्या टाटा कॅपिटल या कंपनीचा आयपीओ येण्याची शक्यता आहे. टाटा कॅपिटल 17000 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणणार आहे.
टाटा कॅपिटलचा आयपीओ येणार अशी माहिती समोर येताच टाटांच्या कंपन्यांचे शेअर वधारले. टाटा कॅपिटलचा आयपीओ सप्टेंबर 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी टाटा कॅपिटलला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या एनबीएफसी संदर्भातील नियमांची पूर्तता करावी लागेल.
टाटा ग्रुपच्या टाटा टेक्नोलॉजी या कंपनीचा आयपीओ नोव्हेंबर 2023 मध्ये आला होता. त्यामुळं या दशकातील टाटा ग्रुपचा हा दुसरा आयपीओ ठरणार आहे.फिनान्शिअल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार टाटा ग्रुपनं टाटा कॅपिटलच्या आयपीओसाठी कोटक इन्वेस्टमेंट बँकिंगला प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे.
सप्टेंबर 2022 मध्ये आरबीआयनं टाटा कॅपिटल फिनान्शिअल सर्विसेसला अप्पर लेअर सिस्टीमेकली महत्त्वाची एनबीएफसीचा दर्जा दिला होता. त्यानुसार त्यासंदर्भातील नियमांची पूर्तता करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी दिला होता. लिस्टींग साठी देखली तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता.
टाटा कॅपिटलकडून टाटा कॅपिटल फिनान्शिअल सर्विसेस, टाटा कॅपिटल हाऊसिंग फिनान्स , टाटा क्लीनटेक कॅपिटल यांना कर्ज दिलं जातं. याशिवाय टाटा सिक्युरिटीज, टाटा कॅपिटल सिंगापूर आणखी एका खासगी कंपनीसाठी इन्वेस्टमेंट अँड अडव्हायजरी बिझनसेस म्हणून काम करते.
टाटा कॅपिटलचे अनलिस्टेड शेअर सध्या 900 रुपयांवर ट्रेड करत आहेत. गेल्या वर्षभरात या कंपनीचे शेअर 450 पासून 1100 रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्याच्या ट्रेडनुसार कंपनीचं बाजारमूल्य 3.74 अब्ज रुपयांच्या जवळपास असेल.
टाटा कॅपिटलचे 92.93 टक्के शेअर टाटा सन्सकडे आहेत. टाटा केमिकल्सला आयपीओद्वारे अधिक भागिदारी मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या त्यांच्याकडे 3 टक्के शेअर आहेत. टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशनकडे 2.2 टक्के शेअर आहेत. टाटा कॅपिटलचा महसूल 34 टक्क्यांनी वाढून 18178 कोटींवर पोहोचला आहे. तर, नफा 3315 कोटी रुपयांचा झाला आहे.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)