Adani Group Supreme Court: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थापन केलेल्या विशेष समितीचा अहवाल समोर आला आहे. समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, प्रथमदर्शनी विद्यमान नियमांचे किंवा कायद्यांचे कोणतेही उल्लंघन आढळले नाही. हा अहवाल सार्वजनिक होताच अदानी समूहाच्या (Adani Group) कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली. अदानी पॉवर (Adani Power) आणि अदानी ग्रीनच्या (Adani Green) शेअर्सना प्रत्येकी पाच टक्क्यांच्या तेजीसह अप्पर सर्किट लागले. शुक्रवारी सकाळी शेअर व्यवहारात अदानीचे शेअर्स कमजोर दिसत होते. मात्र सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या विशेष समितीचा अहवाल समोर येताच शेअर्समध्ये तेजी दिसून आली.
नियमांचे उल्लंघन नाही
सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालात अदानी समुहाने सर्व लाभकारक अशा सर्व भागीदारांबाबतची माहिती जाहीर केलेली आहे. अदानी समूह लाभार्थ्यांची नावे जाहीर करत नसल्याचा ठपका सेबीने ठेवलेला नाही, असेही सांगण्यात आले आहे. सध्याच्या नियमांचे किंवा कायद्याचे कोणतेही प्रथमदर्शनी उल्लंघन झालेले नाही, असे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्याशिवाय, हिडनबर्ग अहवालानंतर काही कंपन्यांनी अल्पावधीत समभाग विक्रीतून अल्पावधीत कमावलेल्या नफ्याची चैकशी होणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मालमत्ता व्यवस्थापनांतर्गत विविध 13 परकीय संस्था तसेच 32 भागधारकांबाबतची पुरेशी माहिती सेबीकडे अद्याप नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा 13 संस्थांबाबतची थकित चौकशी पुढे करावयाची किंवा नाही हे सेबीवर समितीने सोपवले आहे. त्याशिवाय, संबंधित प्रकरण सक्तवसुली संचलनालयाकडे (ED) सोपविण्याबाबत सेबीने कोणतेही मुख्य आरोप केले नसल्याचे आढळून आले आहे.
सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने म्हटले की, आर्टिफिशियल किंवा कृत्रिमपणे ट्रेडिंग केल्याचे पॅटर्न दिसून आले नाही. त्याशिवाय अदानी समूहातील कंपन्यांच्या ट्रेडिंगमध्ये काही गडबड असावी, असेही आढळून आले नाही. सेबीला असे आढळून आले की काही कंपन्यांनी हिंडेनबर्ग अहवाल येण्यापूर्वीच शॉर्ट पोझिशन घेतल्या होत्या. अहवाल आल्यानंतर अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती घसरल्याचा त्यांनी फायदा घेतला. समितीने नमूद केले की अदानी समूहाच्या शेअर दराचे स्टॉक मार्केटने पुनर्मूल्यांकन केले आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर दरात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता दिसून आली होती.